बालकांवरील अत्याचारात वाढ !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
महाराष्ट्रातील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून गेल्या तीन वर्षाच्या आकडेवारीतून ही बाब उघडकीस आली आहे. बालकांच्या अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे धक्कादायकरीत्या समोर आले आहे.
गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीत राज्यात बालकांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सन २०२५ मध्ये हा आकडा २५ हजारांच्या पुढे गेला असून, मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा सरकारसाठी जनतेची बाब बनला आहे.
महाराष्ट्र राज्याचा ‘आर्थिक पाहणी अहवालात राज्याच्या प्रगतीसोबतच ही एक अत्यंत चिंताजनक व धक्कादायक बाजू समोर आली आहे.

सन २०२३ मध्ये बालकांवरील नोंदवलेल्या एकूण गुन्ह्यांची संख्या २२ हजार ४९४ इतकी होती. २०२४ मध्ये ही संख्या थोडी वाढून २२ हजार ७६७ झाली. मात्र, २०२५च्या ताज्या आकडेवारीनुसार हा आकडा २५ हजार २३४ वर पोहोचला आहे. एका वर्षात झालेली ही वाढ राज्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
केवळ कायदे करून बालकांवरील अत्याचार थांबणार नाहीत. यासाठी हे कायदे राबवताना संवेदनशील कृतीची आवश्यकता आहे. जेणेकरून बालकांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाई होऊन त्यांना शासन होईल. अशा प्रतिक्रिया यातील जाणकार व्यक्ती नोंदवितात.

अपहरण आणि बलात्काराच्या घटनांत देखील मोठी वाढ होत असल्याचे नेहमीच समोर येत आहे. संगमनेर तालुक्यात देखील अल्पवयीन मुली मुले गायब होण्याचे प्रमाण आहे. राज्यात सन २०२४ मध्ये १२ हजार ६७१ असलेल्या या केसेस सन २०२५ मध्ये १४ हजार ४०४ पर्यंत वाढल्या आहेत. बालकांवरील अत्याचार प्रकरणी सन २०२४ मध्ये ४ हजार ७५५ गुन्हे नोंदवले गेले होते, जे २०२५ मध्ये वाढून ५ हजार ३३० झाले. बालकांच्या खुनाच्या घटनांमध्ये सन २०२३ व २०२४ च्या तुलनेत घट झाली. २०२५ मध्ये ७० बालकांचा खून झाला असल्याची माहिती उपलब्ध आहे.

