गाथा पुनरुत्थान दिन आनंदमहोत्सव
संत बहिणाईंनी त्यांच्या सुप्रसिद्ध अभंगात लिहून ठेवलं आहे, “ज्ञानदेवे रचिला पाया” आणि “तुका झालासे कळस”. याचा अर्थ जगद्गुरू संत तुकाराम महाराज हे भागवत धर्माच्या इमारतीचा कळस झाले वा त्यांनी भागवत धर्म कळसाला पोहोचवला. म्हणजेच भागवत धर्म लोकप्रिय केला, भागवत धर्माची तत्वे, मूल्ये यांना लोकाधार प्राप्त करून दिला.
तुकाराम महाराजांच्या आयुष्यातली एक अभूतपूर्व घटना म्हणजे त्यांना धर्मपीठापुढे खेचून त्यांना त्यांची गाथा बुडवण्याची आणि घरदार जप्त करण्याची सुनावलेली शिक्षा आणि या बुडवलेल्या गाथेचं पुनरुत्थान!
महाराष्ट्राच्या इतिहासात संतांच्या मांदियाळीतल्या दुसऱ्या कोणत्याही संताला धर्मपीठापुढे खेचण्यात आलं नाही. संत ज्ञानदेव आणि भावंडं स्वत: होवून पैठणच्या धर्मपीठासमोर न्याय मागायला गेली होती. पण त्यांना तिथे न्याय मिळाला नाही. तुकाराम महाराज हे भक्तिसंप्रदायी कवी होते आणि त्यांनी भक्तिकाव्य लिहिलं असं लेखणीच्या ठेकेदारांनी समाजात पसरवलं. मग त्यांची ‘गाथा’ का बुडवण्यात आली? त्यांना पुन्हा अभंग लिहिण्यावर बंदी का घालण्यात आली? त्यांना देशोधडी लावायचा प्रयत्न का करण्यात आला? धर्माच्या ठेकेदारांना तुकाराम महाराजांचा इतका राग का होता? त्यांना या गाथेची भीती का वाटत होती? सामान्य माणसाच्या मनात असे प्रश्न येत नसले तरी विचारी माणसाला हे प्रश्न पडले पाहिजेत आणि त्यांच्या उत्तरांचा त्याने शोध घेतला पाहिजे. महिपतीने लिहीलं आहे, ‘देशोधडी करावा तुका’ असा विचार मनात धरून, रामेश्वर भटाने,
ऐसे म्हणोनिया मनांत l भीड खर्चिली दिवाणात ll
म्हणे तुका शूद्र जातीचा निश्चित l श्रुतीमतितार्थ बोलतो ll
हरिकीर्तन करुनि तेणें l भाविक लोकांसी घातले मोहन ll
त्यासी नमस्कार करिती ब्राह्मण l हे आह्मांकरणे अश्लाघ्य ll
सकळ धर्म उडवूनि निश्चित l नाममहिमा बोले अद्भुत ll
जनात स्थापिला भक्तिपंथ l पाखांड मत हे दिसें ll
तुकाराम महाराजांच्या विरुद्ध दिवाणात तक्रार दाखल करण्याचा रामेश्वर भटाचा हेतू, त्याच्या रागाची कारणं, तुकाराम महाराजांचं कार्य आणि त्यांचे परिणाम यावर महिपती प्रकाश टाकतो. तुकाराम महाराज जातीने शूद्र असूनही ते श्रुतीचा मतितार्थ सांगतात, त्यांनी लोकांना इतकी मोहिनी घातली आहे की ब्राह्मणही त्यांना नमस्कार करतात, ते सर्व धर्म उडवून लावत, नामाचा महिमा अदभूत असल्याचा प्रचार करतात आणि त्यांनी जनात भक्तिपंथ स्थापन केला आहे ही तुकाराम महाराजांवरच्या रागाची कारणं होती. हे सर्व आरोप खरे होते. पण ते त्यांचे गुन्हे होते का? मनुस्मृतीवर आधारित वर्णधर्म वा ब्राह्मण धर्मानुसार ब्राह्मण पुरुष सोडून बाकी सर्व शूद्र असतात. शूद्राला ज्ञानाचा, ग्रंथ लिहिण्याचा, वाचण्याचा, श्रुतींवर भाष्य करण्याचा अधिकार नव्हता. कोणाचा गुरु होण्याचा अधिकार नव्हता. ब्राह्मणाकडून पाया पडून घेण्याचा अधिकार नव्हता. तुकाराम महाराज कुणबी म्हणजे शूद्रच होते.
त्याकाळी चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणं, ब्राह्मण ग्रंथ हेच ज्ञान समजलं जात होतं. शूद्रांना वेद वाचण्याचा अधिकार नव्हता. शूद्राने जर वेदवाणी उच्चारली तर त्याची जीभ कापण्याची, शूद्राने वेदवाणी ऐकली तर त्याच्या कानात उकळत्या शिशाचा रस ओतण्याची शिक्षा होती. वेद हे अपौरुषेय समजले जात होते. वेदांची निंदा हा अक्षम्य अपराध होता. पण हा गुन्हा तर संत ज्ञानदेवांनीही केला होता. “वेदु संपन्नु होय ठायी l परी कृपणु ऐसा आन नाहीं ll जो कानीं लागला l तिहीं वर्णांचिया ll” इतकंच काय तर माऊली पुढे म्हणतात, “जरी वेदे बहु बोलिलेl विविध भेद सुचिले l तरी आपण हित आपुले l ते चि घ्यावें ll” वेद कृपण आहेत, वेदांत भेद आहेत, आपण त्यातलं जे आपल्या हिताचं आहे तेच घ्यावं असं म्हणणं म्हणजे वेदांची एकप्रकारे निंदाच होय. तुकाराम महाराजही स्पष्ट शब्दात म्हणतात, “गाळूनिया भेद l आह्मा प्रमाण ऐसा वेद ll” वेदातला भेद गाळून उरलेला वेद आम्ही प्रमाण मानतो. तुकाराम महाराज असंही म्हणतात, “तुका ह्मणे काहीं l वेदा वीर्यशक्ती नाही ll” वेदात वीर्यशक्ती नाही म्हणजे ते नपुंसक, वांझ, निरुपयोगी आहेत.
शूद्राने ब्राह्मणाच्या पाया पडाव्या, ब्राह्मणाने शूद्राच्या पाया पडू नयेत असा मनुस्मृतीचा नियम होता. पण “विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म l” ही भागवत धर्माची शिकवण आहे. “सर्वांभूती ब्रह्म आहे, म्हणून सर्वांभूती समत्व आहे” यावर विश्वास असणारे वारकरी ब्राह्मण तुकारामांप्रमाणेच इतर स्त्री-पुरूषांच्याही पाया पडत. तुकाराम महाराजांनी वर्णन केल्याप्रमाणे,
खेळ मांडियेला वाळवंटी घाई l नाचती वैष्णव भाई रे ll
वर्ण अभिमान विसरली ज्ञाती l एक एका लोटांगणी जाती ll
वारकऱ्यांसाठी यात काही अप्रूप नसलं तरी वैदिकांच्या मते हा गुन्हा होता. तिसरा आरोप असा होता की तुकाराम महाराज भक्तिमार्गाचा प्रचार करतात आणि त्यांनी इतर धर्म उडवून लावले आहेत. श्री ज्ञानदेव-नामदेव महाराजांनी तेराव्या शतकात इथल्या सर्वसामान्य माणसाना, शूद्रातिशूद्रांना नवा ‘नामधर्म’ दिला आणि तोच वारसा तुकाराम महाराज पुढे नेत होते. संतशिरोमणी नामदेव महाराजांनी तेव्हाच सांगितलं होतं, “न पढावे वेद नको शास्त्रबोध l नामाचे प्रबंध पाठ करा ll” संत ज्ञानदेवांनी हरिपाठात जागोजागी योगयाग, होमहवन, जपतप, दानधर्म आदी सर्व वैदिक धर्मठगांचे मार्ग निरुपयोगी असल्याचं सांगून नाममार्गाचा पुरस्कार केला आहे. “योगयाग विधी येणें नोहे सिद्धी l वायांची उपाधी दंभधर्म ll” किंवा “योगयागक्रीया धर्माधर्म माया l गेलें ते विलया हरिपाठे ll” इतकं सांगून माऊली थांबत नाहीत तर, “पारियाचा रवा घेता भुईवरी l यज्ञ परोपरी साधन तैसे ll” या शब्दात यज्ञांची निष्फळता माऊली स्पष्ट करतात. आणि ही वैदिक पुरस्कृत सर्व कर्मकांडं सोडून द्या, एक नाममार्ग तेवढा स्वीकारा असं संत ज्ञानदेव सांगतात. तेच तुकाराम महाराज सांगत होते. “मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर l केला राज्यभार चाले ऐसा ll” या शब्दात आम्ही धर्मठगांच्या सर्व वाटा मोडून टाकल्या आहेत आणि सर्वांना सहज-सुलभ, निर्धोक आणि खात्रीचा असा नाममार्ग दिला आहे, “तुका म्हणे सोपी केली पायवाट l तरावया भावसागर रे ll” असं तुकाराम महाराज सांगतात. “मायबापें केवळ काशी l तेणें न वजावें तीर्थासी ll” या शब्दात तुकाराम महाराज वैदिकांची तीर्थक्षेत्रे नाकारली आणि आईबाप हीच खरी तीर्थे असून, त्यांना सोडून इतर तीर्थांना जाऊ नका असं सांगितलं. “तीर्थी धोंडा पाणी l देव रोकडा सज्जनी ll” या शब्दात वैदिकांच्या तीर्थक्षेत्रांचं महात्म्य त्यांनी नाकारलं, या तीर्थात फक्त धोंडा आणि पाणी आहे, तिथे देव नाही, देव सज्जन माणसात असल्याचं तुकोबांनी सांगितलं. तीर्थाला जाणाऱ्यांना, “जाऊनिया तीर्था काय तुवां केलें l चर्म प्रक्षाळिले वरी वरी ll अंतरीचे शुद्ध कासयाने झाले l भूषण त्वां केले आपणिया ll” तीर्थाला जाऊन तू वरवरचं चामडं धुतलंस पण तुझ्या अंत:करणातला मळ, वासना, विकार कसे नष्ट झाले ते सांग असा प्रश्न विचारला. तीर्थात बुडी मारली तर मोक्ष मिळतो सांगणाऱ्यांना ते विचारतात, “तुका ह्मणे गंगाजळी l कावळी सुसरी का न न्हाती ll” गंगेच्या पाण्यात रोज स्नान करणाऱ्या कावळ्यांना, गंगेच्या पाण्यातच अखंड राहणाऱ्या सुसरींना मोक्ष मिळत नाही तर तुला एक बुडी मारून मोक्ष कसा मिळेल असा प्रश्न तुकाराम महाराज विचारतात. “सत्य असत्यासी मन केल ग्वाहीं l मानियेले नाही बहुमता ll” या शब्दात तुकाराम महाराज आपल्याला विवेकाने विचार करायला, सत्याची कास धरायला आणि त्यासाठी बहुमताचा विरोध पत्करायला शिकवतात. योगयाग, होमहवन, जपतप, व्रतवैकल्ये, दानधर्मादी कर्मकांडांवरच ब्राह्मणाचा उदरनिर्वाह चाले. मंदिरं आणि तीर्थक्षेत्रं या त्यांच्यासाठी कमाईचे तर बहुजनांसाठी शोषणाचे अड्डे होते. त्यांच्यावरच घाव घातल्याने ते चवताळणे साहजिकच होतं. म्हणून ते हा विवेकी विचार नष्ट करण्याचा, तुकाराम महाराजांचं तोंड बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.
जन्मजात उच्चनीचता हे वर्णधर्म वा ब्राह्मणधर्माचं वैशिष्ट्य होतं. या धर्मात व्यक्तीचं श्रेष्ठत्व आणि अधिकार त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला त्यावर अवलंबून होता. जो वरच्या वर्णात जन्मला तो श्रेष्ठ, त्याला सर्व अधिकार आणि जो स्त्री वा शूद्र वर्णात जन्मला तो तुच्छ आणि त्याला कोणतेही अधिकार नाही असे मनुस्मृतीचे नियम होते. भागवत धर्माने जन्माधिष्ठित भेदाभेद नाकारले. माणसाचं श्रेष्ठत्व त्याच्या जन्मावरून नाही तर कर्मावरून ठरतं असं भागवत धर्म सांगतो. “अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड l काय त्यासी रांड प्रसवली ll वैष्णव चांभार धन्य त्याची माता l धन्य उभयता कुळयाती ll” म्हणजे अभक्त ब्राह्मणापेक्षा वैष्णव चांभार आणि त्याला जन्म देणारी माता या उभयतांचं कुळ आणि याती श्रेष्ठ असते असं तुकाराम महाराज सांगतात. “सकलांसी येथे आहे अधिकार l कलियुगे उद्धार हरिच्या नामें ll ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार l बाळे नारीनर आदी करोनि वेश्याही ll” या शब्दात जात, धर्म, वर्ण, लिंग, व्यवसाय कोणताही असला तरी सर्वांना समान अधिकार आहेत असं तुकाराम महाराज सांगतात. सर्व समान, सर्वांना समान अधिकार हा विचार वर्णवर्चस्ववादी ब्राह्मणांनी आजवर कधीही मान्य केलेला नाही. जो असा विचार मांडेल त्याला ते आपला शत्रू मानतात. म्हणूनच अशा व्यक्तीला, या विचाराला समाजातून समूळ नष्ट करण्याचा ते अप्रयत्न करतात. तुकाराम महाराजांची गाथा बुडवणं म्हणजे समतेचा विचार नष्ट करणं. ‘गाथा’ बुडवण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यावर उत्तर पेशवाईत, दुसऱ्या बाजीरावाने देहुतला गाथा आपल्या हस्तकामार्फत मागवून घेतला आणि नष्ट केला. तुकाराम महाराजांच्या अभंगांचे चुकीचे अर्थ सांगण्याचे प्रयत्न हे गाथा बुडवण्याचेच प्रयत्न आहेत. तुकाराम महाराजांची गाथा हे ‘संकलन’ आहे असं म्हणणं हा तुकोबांची गाथा बुडवण्याचाच वर्तमानकालीन अश्लाघ्य प्रयत्न होता. असे अनेक प्रयत्न होऊनही गाथा तरली, तिचं पुनरुत्थान होतं राहिलं ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. कारण ‘गाथा’ हे आपलं अक्षय धन आहे. राजारामशास्त्री भागवत म्हणत, “आम्हा मराठी माणसासाठी ‘ज्ञानेश्वरी आणि गाथा’ हे इतके महत्वाचे आहेत की ते राहिले आणि बाकी सर्व ग्रंथ बुडाले तरी काही फरक पडणार नाही”. अशी ही गाथा तरली याचा आनंद व्यक्त करण्यासाठी दरवर्षी चैत्र शुद्ध तृतीयेला, यावर्षी २१ मार्च २०२६ रोजी सर्व गाथाप्रेमी देहू येथे जमतात. ज्याठिकाणी गाथा बुडवली होती त्याच आनंदडोहाच्या काठावर जमून गाथेचं जाहीर पारायण करतात. गाथा पुनरुत्थानाचा आनंद उरात भरून घेऊन गावोगावी परततात. कोणी गावोगावी तुकाराम महाराजांच्या गाथेची मिरवणूक काढतात. यादिवशी प्रत्येकाने एक अभंग वाचून, रेकॉर्ड करून तो समाजमाध्यमांवर टाकावा, शाळा चालकांनी वा मुख्याद्यापकांनी तुकाराम महाराजांचे पाच अभंग आपल्या विद्यार्थ्यांकडून म्हणून घ्यावेत, ते रेकॉर्ड करावे व समाजमाध्यमांवर टाकावे असं आवाहन गाथा परिवाराच्या वतीने करण्यात येत आहे. जय जगद्गुरू!
उल्हास पाटील, अध्यक्ष, गाथा परिवार.
