अवैध गर्भलिंग निदान रॅकेट..!

नाशिक जिल्ह्यातील एका डॉक्टरसह दोघांना अटक ; एकूण 18 आरोपी —

अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली कसून तपास 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुरू झालेले गर्भलिंग निदान व अवैध गर्भपात प्रकरणाची व्याप्ती वाढतच असून श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली अगदी कसून तपास करीत पोलिसांच्या टीमने या रॅकेटला उध्वस्त करण्याचे काम सुरू ठेवले आहे. लोणी श्रीरामपूर राहाता पुणे सह नाशिक जिल्ह्यातून एकूण 18 आरोपींना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी सुरुवातीला लिंगनिदान चाचणी व अवैध गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये सुरुवातीला नेवासा येथील डॉक्टर भणगे, दोन एजंट व सहा कुटुंबीय असे एकूण 9 जणांना अटक करण्यात आले होते. अटक आरोपींकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन, 3 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर गुन्ह्याचा पुढील तपास करत असताना पुन्हा ढगे नामक आरोपीकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले. तसेच अनेक एजंटलाही अटक करण्यात आली. गुन्ह्याचा बारकाईने तपास करत असताना पुन्हा श्रीरामपूर येथील डॉक्टर कुटे व डॉक्टर शेख यांनाही या गुन्ह्यांमध्ये लिंगनिदान चाचण्या करणारे त्याचप्रमाणे अवैध गर्भपात करणारे म्हणून अटक करण्यात आली. 

त्यानंतर पोलिसांनी गुन्ह्याचा बारकाईने तपास सुरू ठेवला व लिंग निदान चाचणी करणाऱ्या व बेकायदेशीर मशीन विक्री करणाऱ्या पुणे येथील दोन डॉक्टर व एक व्यक्तीला अटक केली. त्यानंतर लगेचच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे याला आरोपी करून त्याच्याकडून अवैध लिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरत असलेले मशीन जप्त केले.

सदर गुन्ह्याचा तपास अतिशय शाश्त्रोक्त पद्धतीने व बारकाईने करत असताना तपासात असे निष्पन्न झाले की, पुणे येथून अटक करण्यात आलेले दोन डॉक्टर व एक मेडिकल साहित्य विक्री करणाऱ्या आरोपींकडून नाशिक येथील निफाड तालुक्यातील 2 डॉक्टरांनी देखील अवैधपणे लिंगनिदान चाचणी करणारे सोनोग्राफी मशीन त्यांच्याकडून विकत घेतल्याचे निष्पन्न झाले.

 त्यानुसार श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी कार्यालयातील पथक नमूद डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी रवाना केले होते. पथकाने आज पहाटे त्या दोघांनाही ताब्यात घेतले. 

      

1) डॉ. कुणाल प्रभाकर वल्टे, (वय 33 वर्ष bams रा. टेकडी कॉलेजचे समोर, सरस्वती नगर, निफाड तालुका, ता. निफाड जि. नाशिक)

 सदर डॉक्टरचा करंजगाव ता. निफाड येथे दवाखाना आहे. याने ठाकरे कडून सोनोग्राफी मशीन घेतलेले आहे. हा डॉ भानगेचा वर्ग मित्र आहे. 

2) सागर शांताराम उल्हाळ (वय 25 रा. उल्हाळे कॉम्प्लेक्स, नांदूर मधमेश्वर, ता. निफाड, जि. नाशिक) याची डॉक्टर वल्टेच्या शेजारी ब्लड टेस्टिंग लॅब आहे. डॉक्टर वल्टे याने त्याची सोनोग्राफी मशीन याच्या लॅब मध्ये ठेवण्यासाठी दिलेले होते.

या दोघांनाही गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता 4 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. आतापर्यंत गुन्ह्यामध्ये 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्यापैकी सहा डॉक्टर आहेत.

याशिवाय गुन्ह्यामध्ये आतापर्यंत झालेल्या तपासात अवैध गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी वापरण्यात येणारे एकूण चार सोनोग्राफी मशीन वेगवेगळ्या ठिकाणावरून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या आरोपींकडून जप्त करण्यात आले आहेत. तसेच तीन चार चाकी गाड्या देखील जप्त करण्यात आले आहे.

पुण्याचा पुढील तपास अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक एम सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक भारती व सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे करत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!