नेहरू गार्डन समोरील गाळे पाडून गार्डनसह जागा भांडवलदाराच्या घशात घालण्याचा उद्योग ! —

सेवा समितीला सहकार्य आणि मते देणारे नागरिक पश्चातापाच्या मार्गावर…

 संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर नगरपालिकेच्या बहुचर्चित निवडणुकीत ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ पक्षाच्या सेवा समितीला संगमनेरच्या मतदार नागरिकांनी भरघोस मतांनी विजयी करून पालिकेची सत्ता सोपवली. मात्र अवघ्या काही महिन्यात नागरिकांना पश्चाताप करण्याची वेळ येत असल्याचे प्रकार समोर येत असून नेहरू गार्डन समोरील गाळे पाडण्यात येणार आहेत. या ठिकाणी मोठे व्यापारी संकुल उभारण्यात येऊन ते श्रीमंतांना चालविण्यासाठी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. नेहरू गार्डन सह गाळ्यांची जागा एका मोठ्या भांडवलदाराच्या घशात घातली जाणार असल्याचेही बोलले जात आहे. नोटिसा बजावल्याने गाळेधारक हवालदिल झाले असून ‘सेवा समिती श्रीमंताच्या पायाची बटीक झाली’ असल्याचे आरोप आता होऊ लागले आहेत. 

सध्या नगरपालिकेचा कारभार नगराध्यक्ष करत नसून विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्या आदेशाने चालू असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. मुळात त्यांचा हस्तक्षेप वारंवार यात दिसून आलेला आहे. त्यामुळे सेवा समितीचा कारभार हा जनतेच्या मुळावर उठला असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होतात.

नगराध्यक्ष फक्त ‘शोभेची बाहुली’ असून प्रत्यक्ष कामात आमदार साहेबांकडून हस्तक्षेप होत असल्याचे देखील बोलले जात आहे. तसे चित्रदेखील आमदार सत्यजित तांबे यांनी निर्माण केले असून प्रत्येक पत्रकार परिषद ही ते स्वतः घेत असून नगराध्यक्षांना बाजूला बसवून फक्त मान डोलवण्याचे काम करीत असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधून नागरिकांनी अनेक वेळा पाहिलेले आहे. कुठलाही संबंध नसलेली बाहेरची मंडळी नगरपालिकेच्या कामात हस्तक्षेप करत असून नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांवर व अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्याचे उद्योग देखील केले जात असल्याची चर्चा आहे.

आमदार सत्यजित तांबे यांचा नगरपालिकेतील वाढता हस्तक्षेप याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार करण्यात आलेली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी नगरपालिकेत सत्यजित तांबे आणि विरोधकांमध्ये मोठी खडाजंगी झाली होती. त्यामध्ये एकमेकांवर चांगले तोंडसुख घेण्यात आले होते. शहराचा विकास करण्याचे सोडून फक्त डिजिटल माध्यमातून रील काढणे, व्हिडिओ टाकणे, फोटो टाकणे एवढा एकच उद्योग सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याचा आरोप होत आहे. यातून विकास कसा होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अमर कतारी यांनी नगराध्यक्ष आणि आमदार सत्यजित तांबे यांना निवेदन देऊन नेहरू गार्डन समोरील गाळ्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. एवढेच नव्हे तर हे गाळे चांगले सुस्थितीत असताना पाडण्याचे कारण काय असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांनी भरभरून मतदान केले आहे, त्यांचा अपमान करू नये अशी त्यांची अपेक्षा आहे. एकंदरीत पाहता विकासाच्या नावाखाली भांडवलदारांचे भले करण्याचा प्रयत्न तर नाही ना ? असा संशय आता नागरिकांना येऊ लागला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!