स्वच्छ सुंदर संगमनेरची ऐशी तैशी….

रियल नव्हे, रिल्सचा कारभार !

संगमनेर प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील नागरिकांची फसवणूक करण्यासाठी फक्त प्रसिद्धी, स्टंटबाजी, जाहिरात बाजी करून शहरात विकासाचे भव्य मॉडेल उभे केले जात असल्याचा दिखावा संगमनेर नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात मात्र शहरातील अनेक मूलभूत समस्या जैसे थेच असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे मोठा गाजावाजा करत ज्या काही कारवाया नगरपालिकेकडून करण्यात आल्या त्या अक्षरशः फोल ठरल्या असून नगरपालिकेचे कामकाज हे फक्त कोणाच्यातरी इशाऱ्यावरून चालू असल्याचे समोर येत आहे. 

स्वच्छतेच्या बाबतीत फक्त ठराविक भागातील छायाचित्रे आणि रील प्रसिद्ध करून स्वच्छता मोहीम चालू असल्याचे सत्ताधारी नगरसेवक स्वतःची पाठ थोपटून घेत असले तरी प्रत्यक्षात मात्र संगमनेर शहर अस्वच्छ आणि कचऱ्याने भरलेले असल्याचे दिसते. शहरातील विविध भागात अक्षरशः कचराकुंड्या तयार झाला असून नागरिक रस्त्यावर, चौकाचौकात, कोपऱ्यांमध्ये, उपनगरात वर्दळ नसलेल्या रस्त्यावर कचरा फेकत असून नगरपालिकेकडून कुठलीही स्वच्छता केली जात नसल्याचे दिसते.

 

प्रत्येक प्रभागांमध्ये अशीच अवस्था असून अडचण होऊ नये म्हणून काही भागातील नागरिकांवर कुठलीही कारवाई केली जात नाही. कचरा टाकणाऱ्यांवर देखील कारवाई होत नाही. ओला कचरा, सुका कचरा वेगळा करण्याचा धाक फक्त सर्वसामान्य नागरिकांना असून वशिल्यावाले आणि राजकीय पदाधिकारी, पुढारी कार्यकर्ते यांना मात्र सवलत दिली जात आहे. शहरातील काही भागांमध्ये अक्षरशः कचराकुंड्या तयार झालेल्या आहेत.

शहरातील महत्त्वाचा भाग असणाऱ्या श्री स्वामी समर्थ मंदिर परसरातील म्हाळुंगी नदी पुलाच्या कडेला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले असून या ठिकाणी पर्यावरणास घातक कचरा नदीपात्रात टाकण्यात आलेला आहे. साईनगर परिसरात देखील रस्त्याच्या कडेला थेट कचराकुंडी तयार करण्यात आलेली आहे. या ठिकाणी डुकरांनी देखील हैदोस घातलेला आहे. एका पेट्रोल पंपा जवळ देखील कचराकुंडी करण्यात आलेली आहे. हा कचरा उचलला जात नसल्याची तक्रार नागरिक करतात. लाल तारा कॉलनी रस्त्यावरच कचरा टाकण्यात येतो. काठे मळ्याच्या बाजूला देखील रस्त्यावर झाडांमध्ये कचरा टाकून घाण करण्यात आलेली आहे. रंगार गल्ली घोडेकर मळा अशा परिसरात झाडाखाली कचरा टाकण्यात येतो. गजानन महाराज मंदिर साईनगर परिसरात देखील हाच प्रकार आढळून येतो. हा शहरातील एका भागातलाच पाहणी अहवाल आहे. शहरातील विविध उपनगरात देखील हाच प्रकार सुरू आहे. स्टेडियम मागील रस्त्यावर चोहोबाजूंनी कचरा टाकण्यात येतो. या रस्त्यावर अतिक्रमणे देखील झालेले आहेत. 

शहरातील एकाच वार्डातली परिस्थिती अशी आहे तर संपूर्ण शहरात काय परिस्थिती असेल याचा अंदाज यावरून दिसून येतो. कचरा गोळा करणाऱ्या गाड्या फक्त नागरिकांवर दबाव आणून कचरा गोळा करतात. शहरातील कुठलाही कचरा उचलला जात नाही. स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेरच्या घोषणा फक्त जाहिराती पुरत्या असून फक्त नगरपालिकेचे काम डिजिटल पद्धतीने पडद्यावर दाखवणे, रील तयार करणे, सोशल मीडियावर गाजावाजा करणे एवढा एकच उद्योग सत्ताधाऱ्यांकडून केला जात असून नगरपालिकेचे कामकाज रियल होत नसून रिल्सवर आधारलेले झाले आहे. 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!