पूर्वेकडच्या पालक सुभेदारांचे बोल बच्चन !

 

आटपाट नगरीसह अवतीभवतीच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रयत भयभीत झालेली असून दहशतीचे वातावरण आहे. याचे कारण वाढत्या चोऱ्या, गुन्हेगारी असल्याचे सांगत सुभेदारांनी ‘सांगकामे कोतवाल’ बोलवून घेऊन एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत कडक सूचना केल्याच्या वार्ता पसरविल्या. यामुळे काही फरक पडणार नाही अशी नंतरची चर्चा पूर्ण आटपाट नगरीत आणि आटपाट नगरी भोवती सुरू होती. सुभेदारांचे हे बोलबच्चन नेहमीचेच असल्याचे चित्र आहे. आटपाट नगरीच्या परगण्याची जबाबदारी सुभेदारांवर पालक म्हणून आली असली तरी जेव्हापासून जबाबदारी आली आहे तेव्हापासून आटपाट नगरीच्या परगण्याची शांतता, कायदा सुव्यवस्था कायमच ढासळलेलीच आढळून आली आहे.

चोऱ्या, घरफोड्या, मंगळसूत्र चोरी, मोटरसायकलीची चोरी, अमली पदार्थांची वाढलेली तस्करी, गर्भलिंग निदान, बुवा बाबांची अवैध कृत्ये, वाळू, गौण खनिज तस्करी, गोवंश हत्या, अवैध कत्तलखाने, अवैध दारू धंदे, जुगार अड्डे, मटका अड्डे, दहशत, खोटे गुन्हे दाखल करणे, राखीव चमचे आणि बगलबच्चांवर गुन्हे दाखल न करण्यासाठी कोतवालांवर दबाव आणणे, ना आवडत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करणे असेच उद्योग सुरू आहेत. यात कुठलाही खंड पडलेला नाही. हे बंद करण्यासाठी सुभेदारांकडून थेट कुठलीही कृती झाली नाही.

“राजेशाहीत आवडती आणि ना आवडती अशा दोन राण्या असायच्या, ना आवडतीला कायम सवती मत्सराला सामोरे जावे लागत असे. अगदी तसेच आता ‘ना आवडत्या अधिकाऱ्यांवर’ सुभेदारांच्या नाराजीचा वरवंटा फिरत आहे.” असल्या उद्योगांनी कायदा व्यवस्था सुरक्षित राखण्यात कुठलाही फरक पडलेला नाही. रयतेला दहशतीच्याच वातावरणातच राहावे लागत आहे. कॅमेऱ्यासमोर मिटींग घेऊन फक्त नाराजी व्यक्त करणे आणि बोलबच्चन करणे यात ठोस कृती कुठे आहे ? सभेदारांच्या मूळ गावात कोतवाल आणि दहशतीबाबत विविध चर्चा नेहमीच ऐकण्यास मिळतात. या ठिकाणचे कोतवाल व कोतवालांचे साहेब सुभेदारांच्या बगलबच्चांपुढे कसे नतमस्तक झालेले असतात याचे किस्से रयतेला माहित आहेत. त्यामुळे संपूर्ण परगण्याचे पालकत्व सांभाळताना कोतवालीवर अंकुश ठेवण्यासाठी अधिकारी बदलून ‘हा आवडता तो ना आवडता’ असा खेळ करण्यापेक्षा रयतेला संरक्षण, शांतता कशी मिळेल यासाठी खरे प्रयत्न सुभेदारांनी करणे गरजेचे आहे.

परगण्याच्या कोतवालीचे अधिकारी बदलून सुभेदार पालक झाल्यापासून असा कोणता फरक पडला आहे की ज्याने गुन्हेगारी थांबली आहे ? असे काहीही झालेले नाही. उलट गुन्हेगारी फोफावत आहे. वर सांगितलेल्या सर्व घटना जशाच्या तशा घडत आहेत. राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत. स्वतःच्या जवळच्या कार्यकर्त्यांचे गुन्हे दाबले जात आहेत. धार्मिक सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम केले जात आहे. जातीयवाद वाढवला जात आहे. असा सर्व प्रकार सुरू असताना कुठलीही ‘कृती न करता फक्त बोलबच्चन’ करणे ही जुनी सवय चालू ठेवली तर रयतेला कायम दहशतीतच राहावे लागेल. 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!