शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये 70 टक्के सभासद मतदार माहेश्वरी समाजाचे…

एकाच कुटुंबाच्या नातेवाईक सभासदांची संख्या जास्त 

ॲड. संग्राम जोंधळे यांची सोशल मीडियावरील पोस्ट तुफान व्हायरल 

संगमनेर | प्रतिनिधी —

शिक्षण प्रसारक संस्थेची (संगमनेर महाविद्यालय) यावर्षीची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सालाबादप्रमाणे मालपाणी यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पॅनल मोठ्या फरकाने विजयी झाले. मात्र या निवडणुकीत एकमेव विरोधी उमेदवार असलेले ॲड. संग्राम जोंधळे यांनी तब्बल 112 मध्ये खेचून स्वतःचे अस्तित्व दाखवून दिले आहे. ते पराभूत झाले असले तरी या निवडणुकीची चर्चा मात्र झाली. आधीची शिक्षण प्रसारक संस्था आणि आताची शिक्षण प्रसारक संस्था याबाबत अनेक विषय चव्हाट्यावर आले. निवडणुकीनंतर ॲड. जोंधळे यांनी सोशल मीडियावर निवडणुकी संदर्भाने एक पोस्ट टाकली आहे. ती तुफान व्हायरल झाली आहे. सदर पोस्ट जशीच्या तशी खाली वाचकांसाठी…

                नुकतिच शिक्षण प्रसारक संस्था अर्थात संगमनेर कॉलेजच्या मॅनेजमेंट कमिटीची निवडणूक पार पडली. त्यामध्ये एकूण 30 जागेसाठी प्रस्थापितांचा पॅनल उभा होता व मी अपक्ष म्हणून एक उमेदवार त्यांचे विरुद्ध उभा होतो. निवडणुकीच्या काळात मी माझी बाजू आणि या संस्थेचा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला. या देशातील लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांनी निवडणूक लढविणे दुरापास्त होऊन बसलेले आहे. कारण त्या ठिकाणी अनेक मते विकत घेतली जातात जे माझ्या तत्वाच्या व आर्थिक क्षमतेच्या बाहेर आहे. 

या ठिकाणी निवडणूक लढण्याचे कारण असे होते की, या महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध तसेच लोकशाही पद्धतीने निवडणूक झाली पाहिजे. ही संस्था म्हटली की भास्करराव दुर्वे नाना, भरघोस देणगी देणारे सारडा, क्षत्रिय कुटुंब आणि संस्था प्रामुख्याने भरभराटीस आणली ती प्राचार्य म.वि. कौंडिण्य सर यांनी. ओंकारनाथ मालपाणी चेअरमन असेपर्यंतचे कोणीही संस्था आपल्या ताब्यात राहावी म्हणून मनमानी करून संस्थेचे सभासद केलेले नाहीत, एवढेच नाही तर संस्थेचा कोणताही कार्यक्रम असताना त्यावेळेस चेअरमन व पदाधिकारी हे स्टेजवर स्थानापन्न न होता समोरच्या खुर्च्यांवर बसलेले असायचे. 

या संस्थेची निवडणूक होते किंवा नाही हेच समजले जात नाही. या निवडणुकीला सामोरे जाताना लक्षात आले की, मतदार यादीतील 614 मतदारांपैकी सुमारे 70 टक्के मतदार हे माहेश्वरी समाजाचे, 10 टक्के मतदार हे गुजराती समाजाचे आहेत. त्या सर्वांनी निश्चितच सहकार्य केले. मतदार यादीत माझ्या कुटुंबापैकी माझे स्वतःचे एक मत होते. मतदार यादी जर पाहिली तर काही कुटुंबाच्या घरातील व जवळचे नातेवाईक मिळून 50 ते 60 मतदार, खाजगी ऑफिसमधील स्टाफ यांना मतदार करून घेतलेले आहे. त्यांना मी मतदार अशासाठी म्हणतो की ते सभासद म्हणून कोणतीही भूमिका बजावत नाहीत. 

अशा परिस्थितीत 112 मतदारांनी आपल्याला कौल दिला ही कमी बाजू मी समजत नाही. एका उमेदवाराविरुद्ध 30 उमेदवार लढत होते. सगळी यंत्रणा, आर्थिक खर्च, प्रस्थापितांनी ओरिसापासून अमेरिकेपर्यंतचे बोलविलेले मतदार हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य होते. निवडणुकीत माझा खर्च एकूण रुपये साडेआठ हजार इतका झाला. निवडणुकीसाठी माझे मित्र, सहकाऱ्यांनी, आपल्यासारख्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हितचिंतकांनी लक्षणीय साथ दिली. याचे कारण होते की, ज्यांनी संस्था स्थापन केली ते आणि प्राचार्य म.वि. कौंडिन्य यांच्यावर आपले असलेले नितांत प्रेम. समाजामध्ये सदसद विवेक बुद्धीला जर हाक दिली, तर ती जागी होते हा अनुभव आला. 

निवडणुक कोणत्याही पदाच्या लालसेने नाही तर तिचा जन्म ज्या विचारातून झाला ते विचार जिवंत राहिले पाहिजेत यासाठी लढविली. या निवडणुकीत आपण सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल अत्यंत कृतज्ञ असून, आभारी आहे. नवीन काळात आपल्याकडून या निवडणुकीमुळे ऊर्जा मिळाली हे निश्चितपणे सांगू इच्छितो. समाज जाती धर्मापलीकडे जाऊन अधिक प्रगल्भ झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद.

आपला – ॲड. संग्राम माधवराव जोंधळे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!