संगमनेरमध्ये ‘आनंदी रस्ते’ उपक्रम उत्साहात – संगमनेरकरांचा भरभरून प्रतिसाद
संगमनेर प्रतिनिधी :
रोटरी क्लब संगमनेर तर्फे आयोजित ‘आनंदी रस्ते’ हा उपक्रम यावर्षीही अतिशय उत्साहात संपन्न झाला. रोटरी क्लब आपली १२१ वर्षे पुर्ण करीत आहेत, त्यानिमित्ताने रोटरी डे चे औचित्य साधून हा प्रकल्प राबविण्यात आला. शहरातील आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, यांच्यासह संगमनेर शहरातील अनेक मान्यवर, अबालवृद्ध उपस्थित होते.

यंदा या उपक्रमाचे दहावे वर्ष असून, या उपक्रमाची संकल्पना दिलीप मालपाणी यांनी संगमनेरमध्ये पहिल्यांदा राबविली. या निमित्ताने विविध मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूल तसेच श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, शारदा विद्या मंदीर या शाळांनी गायन, पथनाट्य, मल्लखांब, वादनाचे कार्यक्रम तसेच योगा प्रात्यक्षिक सादर केले. तसेच झुंबा डान्स, ओंकार केसेकर यांच्या विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिक, अरविंद गाडेकर यांची व्यंगचित्र, जय भोले ग्रुपतर्फे भजन सादरीकरण, आदी कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. जायंट गोरिला हा बच्चे कंपनीसाठी प्रमुख आकर्षण होते. वर्मा आर्टस् चे संचालक अक्षय वर्मा यांनी रस्ते सुशोभिकरणाचे अतिशय कठीण असे काम केले. यावेळी मुलांना खेळणी व खाऊचे वाटप करण्यात आले.

आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, रोटरी क्लब, संगमनेर आयोजित आनंदी रस्ते या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. रोटरीचे कार्य गेली ४२ वर्षापासून सुरु आहे तर आनंदी रस्ते या उपक्रमाचे १० वे वर्ष आहे. रोटरीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम रोटरी क्लब नेहमी राबवत असतात त्याबद्दल मी रोटरीच्या टिमचे अभिनंदन करतो. या कार्यक्रमात लहानांपासून, मोठ्यांपर्यंत, आमच्या लाडक्या बहिंणींसह, बच्चे कंपनी यात सामील झाले आहे. सर्वांचे अभिनंदन करुन या प्रकल्पाला मी शुभेच्छा देतो.

या प्रकल्पासाठी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी सांगितले की, रोटरी क्लब सामाजिक कामांसाठी ओळखला जातो विशेषत: एकल महिलांसाठी त्यांनी केलेले काम फार मोठे आहे. आजचा हा उपक्रम सुद्धा फार महत्त्वाचा आहे, जीवनात आनंदी असणे व दुसऱ्याला आनंदी ठेवणे यासारखी दुसरे मोठे काम नाही, हे काम रोटरी क्लब उत्साहाने करीत आहे. त्यांच्या कामाला माझ्या खुप खुप शुभेच्छा.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब संगमनेरचे अध्यक्ष विश्वनाथ मालाणी, सेक्रेटरी सौरभ म्हाळस, उपाध्यक्ष महेश वाकचौरे, खजिनदार संकेत काजळे तसेच प्रकल्प प्रमुख समीर शहा, धीरज देशमुख, प्रकल्प समन्वयक अजित काकडे, नरेंद्र चांडक, सीए संजय राठी, दिपक मणियार, राजेंद्र खोसे, भारतभूषण नावंदर, आनंद हासे, विकास लावरे, डॉ. किशोर पोखरकर व रोटरी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली. संगमनेरमधील आबालवृद्ध नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचा समारोप पावणे दोन हजार चौरस फूटाचा भव्य तिरंगा फडकावून करण्यात आला. वंदे मातरमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर देशभक्तीने भारून गेला.
