एका आमदाराची आणि पोलीस अधिकाऱ्याची संगमनेरात खडाजंगी !

प्रतिनिधी —

कोणत्या ना कोणत्या कारणावरून संगमनेर तालुक्यातील पोलीस हा चर्चेचा विषय होत असल्याचे नेहमीच दिसून येते. दोनच दिवसांपूर्वी एका बड्या नेत्याने संगमनेरच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला मोठ्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर ‘झाप झाप झापले’ असल्याची घटना घडली असून दोघांमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा आहे.

कोणत्यातरी एका चोरीचा मुद्देमाल विकत घेण्यावरून संबंधित पोलीस अधिकाऱ्याने त्या नेत्याच्या एका खास समर्थकाला आपल्या कार्यालयात बोलवून दमबाजी केली. कारवाई न करण्यासाठी ऑफरही देण्यात आली. सदर दुखावलेल्या जवळच्या कार्यकर्त्याने त्या नेत्याच्या कानावर सर्व गोष्टी घातल्या. मग काय संतापलेल्या नेत्याने थेट शहरातील त्या कार्यालयात जात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला चांगलेच झापले या बड्या नेत्याला कार्यालयात जाण्याआधी अडविणाऱ्या एका कनिष्ठ कर्मचाऱ्याला देखील या नेत्याने चांगलेच सुनावले.

सध्या संगमनेरात काय चालले आहे, मला काय माहित नाही का ? कोणाच्या खाली काय जळतं, किती अंधार आहे याची सर्व माहिती आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना आणि वागताना नीट वागा. विनाकारण त्यांना त्रास देऊ नका अशा  आणि याहीपेक्षा शेलकी शब्दात नेत्याने अधिकाऱ्याला चांगलेच सुनावले.

रागा रागाने ते नेते कार्यालयातून बाहेर पडले. गडबडलेले, गोंधळलेले, घाबरलेले वरिष्ठ अधिकारी थेट नेत्याच्या मागे मागे धावत जाऊन त्यांना शांत होण्याची विनंती करत असल्याची माहिती समजली आहे. या घटनेची पोलीस वर्तुळात चर्चा असून कार्यालयातील या घटनेची माहिती बाहेर फुटल्याने शहरात देखील उलट सुलट चर्चा सुरू आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!