संगमनेर सुवर्णकार वसुली स्कॅंडल !
एलसीबी आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या वसुली मोहिमेची जोरदार चर्चा !!
विशेष प्रतिनिधी —
एका गुन्ह्याचे कारण झाले आणि चोरीचे सोने पकडले गेल्याच्या घटनेने संगमनेरच्या सुप्रसिद्ध श्रीमंत सुवर्णकार व्यावसायिक क्षेत्रात खळबळ उडाली. चोरीचे सोने घेतले या कारणावरून एलसीबीसह पोलीस खात्यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चांगलाच हात धुवून घेतल्याची चर्चा संगमनेर शहरात सुरू आहे.

संगमनेर अकोले तालुक्यात अवैध धंद्यांचा धुमाकूळ तर सुरूच आहे. मात्र या अवैध धंद्यावाल्यांकडून वसुलीची मोहीम देखील जोरदार सुरू आहे. पोलीस खाते यात सर्वात आघाडीवर असले तरी अशा अवैध धंद्यांवर कारवाया करणाऱ्या एलसीबी कडून सुद्धा या वसुली मोहिमेत हात धुवून घेतला जात आहे. अवैध धंद्यांच्या वरिष्ठांकडे वेळोवेळी तक्रारी होऊनही वरिष्ठांकडून देखील कुठलीच कारवाई होत नसल्याने यामध्ये वरिष्ठांचा देखील छुपा सहभाग असल्याचा दाट संशय व्यक्त होत असून शहरात त्याबाबत विविध चर्चा ऐकण्यास मिळतात.

संगमनेर तालुक्यातील घारगाव, आश्वी, संगमनेर तालुका, शहर, अकोले तालुक्यातील राजुर, अकोले कोतुळ, समशेरपुर, वीरगाव तसेच तळेगाव, बोटा आदी परिसरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. यामध्ये मटका, जुगार अड्ड्यांसह गांजा विक्री, वाळू तस्करी, संगमनेर शहरातला अवैध कत्तलखाना, गुटखा विक्री असे प्रकार आढळून येतात कुठलीही ठोस स्वरूपाची कारवाई झाल्याचे अद्याप तरी दिसून आलेले नाही. हे धंदे अव्याहतपणे चालूच आहेत. बेकायदेशीर दारू विक्रीची केंद्रे तर सर्वत्र आढळून येतात. नव्याने सुरू झालेला भंगार विक्रीवाल्यांकडून होणारा वसुली फंडा देखील आता पोलिसांच्या कारवायांच्या बाबत उलट सुलट चर्चांचा विषय ठरला आहे.

पोलिसांच्या तपासावर असलेले गुन्हे आणि अनेक दिवसांमध्ये तपास होत नसलेले गुन्हे यातून वेगवेगळे अर्थ जरी निघत असले तरी पोलीस त्याचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करतात असे नेहमीच बोलले जाते. तपासात होणारे उद्योग आणि त्यावरून पोलिसांवर होणारे आरोप हेही सर्वश्रुत आहेत. घारगाव पोलिसांच्या कडे असणाऱ्या एका खुनाच्या तपासात देखील असे आरोप नुकतेच झाले. त्यातच घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा संशयास्पद मृत्यू झाला असून देखील पोलिसांना अद्याप त्यात काही आढळून आलेले नाही. तो खून असावा असा संशय व्यक्त असून पोलीस वैद्यकीय अहवालाची वाट पाहत आहेत.

शेतकऱ्यांच्या सामानाच्या चोऱ्या, शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारी, प्लास्टिकची पाईपलाईन, पाण्याची पाईपलाईन, विजवाहक तारांच्या चोऱ्या हा सर्व प्रकार पठारातल्या आणि संगमनेर तालुक्यातल्या भंगार दुकान वाल्यांशी संबंधित असल्याचे दिसून येत आहे. हा चोरीचा माल भंगार विक्री करणाऱ्या दुकानदारांकडून विकत घेतला जातो असे नेहमीच सांगितले जाते.

संगमनेर शहरात आणि तालुक्यात देखील भंगार विक्रीचा कोट्यावधी रुपयांची उलाढाल असलेला मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायावर देखील पोलिसांचा डोळा अनेक दिवसांपासून होता. पोलिसांची आर्थिक वक्रदृष्टी या धंद्याकडेही गेल्या महिन्यात फिरलेली आहे. त्याआधी एलसीबीने देखील तालुक्यातल्या ग्रामीण भागात असणाऱ्या मोठमोठ्या भंगारवाल्यांकडून चांगलीच वसुली केली असल्याची माहिती समजली. एकंदरीत पाहता भंगारवाले हे वसुलीचे नवीन केंद्र झाले आहे. परप्रांतीय मंडळींचा या धंद्यात मोठा सहभाग आहे. त्यांचीही कुठलीही तपासणी होत नसल्याची माहिती मिळते.

दोन-चार दिवसांपूर्वी संगमनेर मधील काही सुवर्णकार व्यवसायांकडे एलसीबीचे पथक चक्कर मारून गेले असल्याची चर्चा शहरात सुरू होती. यात देखील मोठा गडबड घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर पुण्यातील एक पथकही संगमनेरच्या एका सुवर्णकाराची चौकशी करून गेल्याची माहिती मिळते. याआधी देखील मेनरोडवरील एका सुवर्णकारा कडे मुंबईमधील पोलिसांनी कारवाई केल्याचे वृत्त छापून आले होते. असले प्रकार नेमके संगमनेर शहर आणि तालुक्यातच कसे घडतात याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.

अकोले तालुक्यातील राजुर येथील अवैध दारू विक्री तसेच अमली पदार्थांची विक्री याबाबत तेथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेक वेळा आंदोलने केली आहेत. थातुरमातुर कारवाई करून पुन्हा हे धंदे सुरू होतात. भंडारदरा सारख्या पर्यटन क्षेत्रात अवैध दारू विक्रीचे प्रमाण मोठे आहे. विनापरवाना बेकायदेशीर दारू ढाब्यांवरून, हॉटेलवरून विकली जाते. पोलिसांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे सगळे माहित आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी, संगमनेर तालुका, घारगाव या पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील अवैध धंदे सुरू आहेत. कोतुळ, समशेरपुर, विरगाव अशा गावांमधील देखील मटका, जुगार, अवैध गुटखा विक्री केंद्र, गांजा विक्री असे प्रकार होत असतात. या सर्वांवर कायदेशीर कारवाई होते की त्यांच्याकडून वसुली होते हाच नेहमी कळीचा मुद्दा ठरलेला आहे.

