संगमनेर उपविभागात पोलीसिंग बंद… इतर उद्योग मात्र चालू !

प्रतिनिधी —

संगमनेर उपविभागात संगमनेर अकोले तालुक्यात सहा पोलीस स्टेशन असून देखील पोलीसिंग नावाची गोष्ट उरलेली नाही. उत्कृष्ट पोलीसिंगच्या ऐवजी इतर उद्योगांमध्ये पोलीस आणि अधिकाऱ्यांना जास्त इंटरेस्ट असल्याने संगमनेर तालुक्यासह अकोले तालुक्यातील पोलिसांच्या बाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

संगमनेर तालुका (ग्रामीण), संगमनेर शहर, आश्वी, आणि घारगाव असे चार पोलीस ठाणे संगमनेर तालुक्यामध्ये आहेत. तर राजुर, अकोले (शहर व ग्रामीण) हे अकोले तालुक्यातील पोलीस ठाणे आहेत. तालुक्यामध्ये होणाऱ्या विविध अवैध घडामोडी, चोऱ्या, घरफोडी, दरोडे, अवैध व्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक, हाणामाऱ्या, खुन, महिलांवरील अत्याचार, यावर आळा बसावा म्हणून चार चार ठिकाणी पोलीस ठाणे करण्यात आले.

या चार पोलीस स्टेशनचा सर्वसामान्य जनतेला नेमका काय उपयोग होतो ? हा संशोधनाचा विषय ठरला आहे. संगमनेर तालुक्यातून पोलीसिंग गायब झाले असून इतर उद्योगांना मात्र चालना मिळत आहे. ग्रामीण भागात होणाऱ्या चोऱ्यांचे प्रमाण थांबलेले नाही. मोटार सायकल चोरी सर्वच पोलीस ठाण्याच्या क्षेत्रांतर्गत कळीचा मुद्दा ठरलेला आहे. यावर कळस म्हणजे मोठ मोठी चार चाकी वाहने सुद्धा चोरीला जात आहेत. वाहनातून डिझेल चोरीला जाते. डिझेलची अवैध विक्री करणाऱ्या पंपावर छापा टाकून महिना होत आला तरी पोलिसांना आरोपी सापडलेले नाहीत.

पठार भागात आणि ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या सामानाची चोरी थांबलेली नाही यात विहिरीवरील विद्युत पंप केबल शेतीची अवजारे इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांचे पीक देखील चोरून नेले जात आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असा एकही चोरीचा प्रकार राहिलेला नाही की जो चोरांनी अवलंबलेला नाही. कोंबड्या चोरण्यापासून ते थेट गांजा विकण्यापर्यंत आणि किरकोळ हाणामाऱ्यांपासून ते थेट बलात्कार आणि खुनापर्यंतचे गुन्हे घडले आहेत. पोलिसांनी तपास करून कोणतेही यश मिळवले नाही. आरोपींना अटक केलेली नाही. गुन्हेगारांवर वचक बसवलेला नाही.

संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील असेच प्रकार सातत्याने सुरू आहेत. अल्पवयीन मुलींवरील अत्याचार असो अथवा घरफोडी सारखे गुन्हे असो तालुका पोलिसांना यात शोध घेण्यात यश आलेले नाही. मागील महिन्याच्या काळात वडगाव पान मध्ये सातत्याने चोऱ्या होत होत्या. चोरट्यांचा शोध लावण्यात पोलीस अपयशी ठरले. आश्वी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाळू तस्करीचे स्तोम माजले आहे. चोरी, धमक्या असे प्रकार जोरदारपणे सुरू आहेत.

त्याचबरोबर संगमनेर शहर पोलीस ठाणे तर सर्वांवर कळस करत आहे. अवैध धंदे, गोवंश हत्या, अवैध कत्तलखाने, मटका, जुगार अड्डे, गांजा, अमली पदार्थांची विक्री, गुटखा विक्री, कॅफे हाऊस हाऊस मधून चालणारे उद्योग, हाणामाऱ्या, दमदाट्या, ॲट्रॉसिटी, तुरुंगातून चोरटे पळून जाणे असे सर्वच प्रकार घडत आहेत.

अकोले तालुक्यातील राजुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे सर्वश्रुत आहेत. राजूरच्या दारूबंदीचा विषय हा तर नेहमीच ऐरणीवर असतो. अनेक वेळा सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. तरीदेखील येथील अवैध दारू विक्री बंद होण्याचे नाव घेत नाही. भंडारदरा पर्यटन स्थळी आणि राजुरच्या ग्रामीण भागात अवैध दारू विक्री होतच आहे. अवयव प्रवासी वाहतूक तर सर्रासपणे सुरू असते. दाखल होणारे गुन्हे आणि त्याबाबतचा तपास यात गुप्तता पाळण्यात धन्यता मानली जाते.

अकोले तालुक्यातही काही चमत्कार घडेल असा प्रकार नाही. कोतुळ, समशेरपुर, विरगाव ही गावे हॉटसीट आहेत. या ठिकाणी सर्व प्रकारचे अवैध उद्योग सुरू असतात. शहरात मटका आणि जुगारीचे अड्डे आणि हॉटेलमधून होणारी अवैध दारू विक्री हा नेहमीचा चर्चेचा विषय आहे. एकंदरीत पाहता संगमनेर उपविभाग हा पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत चर्चेचा विषय ठरत आहे.

या संपूर्ण विभागात असणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भंगारवाल्यांची दुकाने हा एक आता पोलिसांच्या वसुली बाबत चर्चेचा विषय ठरला आहे. उपविभागातील ग्रामीण भागात परराज्यातून आलेल्या अनेक लोकांनी मोठमोठ्या जमिनीचे क्षेत्र घेऊन त्यामध्ये भंगार व्यवसाय सुरू केला आहे. या भंगार व्यवसायात असे काय मिळते की एक पेक्षा जास्त एकर जागेत ही दुकाने थाटण्यात आली आहेत. या सर्वच दुकानांच्या चौकश्यांचा फार्स केला जातो मात्र त्यातून काहीच बाहेर पडत नाही. याचे नेमके गोड बंगाल काय ? असाही सवाल उपस्थित होत आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील पोलीस कार्यक्षेत्रात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा कुठलाही वचक नसल्याचे दिसून येत आहे. संगमनेर उपविभाग पोलीसिंगच्या बाबतीत अपयशी ठरला आहे. मात्र अवैध उद्योगांना छुपे समर्थन आणि चालना देणारे पोलीसखाते अशी प्रतिमा आता संगमनेर तालुक्यातील पोलिसांची झाली आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!