पोलीस निलंबित झाले, जेलर आणि तुरुंग अधीक्षकांचे काय ?
संगमनेर कैदी पलायन ; संबंधित विभागाचे आणि वरिष्ठांचे मौन
प्रतिनिधी —
संगमनेरच्या तुरुंगातून गज कापून कैदी पळून गेले. या आरोपींना पुन्हा पकडण्यात आले. त्यामुळे संगमनेरातील तुरुंग व्यवस्थेची झालेली दुर्दशा चव्हाट्यावर आली. तुरुंगात होणाऱ्या विविध अवैध, बेकायदेशीर घटना जनतेसमोर आल्या. पोलीस आणि तुरुंग प्रशासनाचे पितळ उघडे पडले. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गार्ड ड्युटीवर असणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. मात्र तुरुंगाच्या संबंधाने विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या असणाऱ्या तुरुंगाचे जेलर आणि तुरुंग अधीक्षक यांच्यावर कोणतेही कारवाई का झाली नाही किंवा काय कारवाई होणार असे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या तुरुंगातून दिनांक ८ नोव्हेंबर रोजी चार कैदी पळून गेले होते. या आरोपींनी तुरुंगातील कोठडी नंबर तीन च्या दक्षिण बाजूकडील तीन गज कापून तुरुंगातून पलायन केले. हे गज कापण्यासाठी त्यांना एक महिना कालावधी लागल्याचे समोर आले. कैदी पळून जाण्यासाठी पोलिसांसह संगमनेरातील काही बाहेरील व्यक्तींची ही मदत झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

यामध्ये पळून गेलेल्या आरोपींसह इतर दोन आरोपी सध्या निष्पन्न झाले आहेत. मात्र तपासात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. कैद्यांना पळून जाण्यासाठी मदत करणारे, हत्यार पुरवणारे व इतर मदत करणाऱ्यांचाही शोध घेतला जाणार आहे. पोलीस ते शोधून काढतीलच. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तात्काळ कर्तव्यात कसूर केला म्हणून त्यावेळी तुरुंग गार्ड ड्युटीवर असणारे तीन पोलीस कर्मचारी निलंबित केले. कैद्यांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती.

मात्र तुरुंगाची सर्व व्यवस्था आणि सुरक्षेचे सर्व नियम याची काटेकोर अंमलबजावणी होती की नाही, यावर लक्ष दिले की जाते की नाही, तुरुंगातल्या सोयी, सुविधा, समस्या अडचणी आणि सर्वात महत्त्वाचे तुरुंगातील कैद्यांच्या हालचाली यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या तुरुंगाचे जेलर आणि तुरुंग अधीक्षक यांच्यावर अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही किंवा तसे संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात आलेली नाही. किंवा त्यांची जबाबदारी होती की नव्हती यावर देखील काहीही खुलासा झालेला नाही. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार की नाही असा सवाल जनतेमधून विचारला जात आहे.

या अधिकाऱ्यांची नेमकी जबाबदारी काय ? त्यांची काहीच जबाबदारी नाही का असेही प्रश्न समोर आले आहेत. संगमनेरच्या तुरुंगात ५३ पुरुष आणि तीन महिला कैदी सध्या असल्याची माहिती मिळाली. या तुरुंगामध्ये ज्या काही सुविधा आहेत आणि ज्या काही सुविधा बाहेरून चोरट्या मार्गाने पुरवल्या जातात यावरही चर्चा सुरू आहे.

तुरुंगातील आरोपींनी या आधी एका आरोपीचा चक्क वाढदिवस साजरा केला होता. या वाढदिवसाला तुरुंगात केक पुरविण्यात आला होता. शिवाय मोबाईल वरून या वाढदिवसाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. तसेच तुरुंगात बिडी, सिगारेट, तंबाखू , घरचे जेवण, खासगी जेवण, मोबाईल फोन आणि इतर सुविधा देखील पुरवल्या जात असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. आणि त्याबाबत विविध आरोप देखील झालेले आहेत.

तुरुंगांच्या कोठड्यांमध्ये जर आरोपींची संख्या वाढलेली असेल आणि आरोपींना त्या ठिकाणी सोयी सुविधा मिळत नसतील तर त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी असणारे अधिकारी काय करत होते ? फक्त दररोज कैद्यांची संख्या मोजणे एवढेच यांचे काम आहे का, जास्त कैदी झाल्यावर त्यांना तातडीने इतर ठिकाणी का हलवण्यात आले नाही हेही प्रश्न अनुत्तरीत आहेत. विशेष म्हणजे या सर्व घटनेनंतर जेलर, तुरुंग अधीक्षक आणि संबंधित विभाग गप्प बसले आहेत. याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे.



