पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांचे निष्ठावान सहकारी सध्याच्या द्वेषाच्या राजकारणापासून चार हात लांब !
विशेष प्रतिनिधी —
संपूर्ण राज्यासह नगर जिल्ह्यातील राजकारणाचा ढासळलेला स्तर हा सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्त्यांना द्विधा मनस्थिती टाकणारा ठरला आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या बाबतीत तसाच प्रकार होऊ लागला आहे. अहमदनगर जिल्हा देखील त्याला अपवाद नाही.

विशेषतः नगर जिल्ह्यातील राजकीय घराणेशाही ही नेहमीच ऐरणीवरचा विषय ठरलेली आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गज या संपूर्ण राजकारणाचे कारभारी आहेत. त्यामध्ये त्यांचे संवाद आणि वाद देखील सर्वश्रूत आहेत. यात विखे पाटील घराणे आघाडीवर असते. जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकांच्या पाडापाडीच्या राजकीय वादामागे विखे पाटील घराण्याचा ‘हात’ नेहमीच दिसून आलेला आहे. तसे आरोपही त्यांच्यावर झाले आहेत. आजही तसेच आरोप त्यांच्यावर होतात. तरीही हे घराणे जिल्ह्यातील राजकारणावर चांगली पकड ठेवून आहे.

पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या विषयी नेहमीच आदरयुक्त भावना सर्वसामान्य नागरिकांसह कार्यकर्त्यांच्या मनात कायम राहिलेली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्ह्यातील राजकारण विखे पाटील घराण्याकडून केले जाईल अशी अपेक्षा सामान्य जनतेमधून आणि राजकारण्यांमधून व्यक्त होत होती. काही वर्ष तो प्रकार झाला. परंतु नवी पिढी राजकारणात आली आणि नगर जिल्ह्यातील सुसंस्कृत राजकारणात ठिणगी पडली असल्याचे आता बोलले जात आहे.

याचा परिणाम विखे पाटील यांच्या राजकीय समर्थकांवर देखील झाला आहे. तसेच चित्र तरी सध्या दिसून येत आहे. या बाबतीत संगमनेर आणि अकोले तालुका यावर लक्ष केंद्रित केले असता सध्या तरी बाळासाहेब विखे पाटील यांना आयुष्यभर साथ देणारे, त्यांच्याशी प्रामाणिकपणे काम करणारे, त्यांच्यासोबत पक्ष म्हणून आणि बाळासाहेब विखे पाटील हाच पक्ष म्हणून व्यक्तिगतरीत्या सोबत असलेली अशी निष्ठावान मंडळी सक्रिय राजकारणापासून चार हात दूर झालेली दिसत आहे. बोलत नसले तरी थोडे नाराज असल्याचेही दिसून येते.

या सर्व ज्येष्ठ आणि निष्ठावान कार्यकर्त्यांशी सध्याच्या नेत्यांनी बोलणे गरजेचे आहे. त्यांची मते जाणून घेण्याची आवश्यकता आहे. यातील काही नेत्यांची आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर नव्या पिढीचे राजकारण आणि त्यातून येणारा आक्रमकपणा याबाबत सर्वांनीच गंभीर प्रतिक्रिया दिल्या.

खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दोघांच्याही बाबतीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया जरी असल्या तरी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकीय हालचालींमध्ये, वक्तव्यांमध्ये आणि राजकीय पद्धतीमध्ये बराचसा बदल जाणवत असल्याचे या मंडळींचे मत आहे. आम्ही ज्यावेळी बाळासाहेब विखे पाटील यांच्यासोबत राजकारण करत होतो. समाजकारण करत होतो त्यावेळेस कुठल्याही बाबतीत टोकाची भूमिका घेतली जात नव्हती. समाजाचे हित होईल, सर्वसामान्य नागरिकांचे कामे होतील हाच मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून वाद, संघर्ष, निवडणुका चालू होत असायच्या.

आजही डॉक्टर सुजय आणि राधाकृष्ण विखे पाटील त्याच मार्गावरून जात असले तरी काही बाबतीत मात्र वेगळी भूमिका घेतली जात असल्याचे जाणवत आहे. आता या निर्णयां मागे ही दिग्गज नेतेमंडळी आहे की त्यांचे कान भरून देणारे आणि नव्याने त्यांच्या अवतीभवती गोळा झालेले राजकीय समर्थक, कार्यकर्ते की आजकालचे ‘लाभार्थी’ आहेत. हा देखील एक संशोधनाचा विषय आहे. अर्थात विखे पाटील घराण्याचे कुणी कान भरून दिले म्हणून ते आपली राजकीय भूमिका निवडतील असा गैरसमज कोणाचा असू नये असे देखील मत ही मंडळी मांडते.

नगर जिल्ह्यात विखे यांचे राजकीयवाद चांगले गाजलेले आहेत त्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील आणि ज्येष्ठ नेते साहित्यिक यशवंतराव गडाख यांचा निवडणुकीचा विषय असो नाहीतर विखे आणि काळे, कोल्हे – विखे आणि थोरात, विखे आणि पिचड यांचा संघर्ष असो हा नेहमीचा चर्चेचा विषय ठरलेला आहे. यावर बोलताना ज्येष्ठ समर्थक पदाधिकारी सांगतात की, त्या काळी सर्वच प्रकारच्या निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटील यांचा नगर जिल्ह्यात दबदबा राहिला आहे. नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा, सहकार क्षेत्रातले साखर कारखाने, बाजार समिती सगळ्याच निवडणुकांवर बाळासाहेब विखे पाटील यांची मजबूत पकड होती. ‘विखे पॅटर्न’ म्हणून ते सर्वश्रुत आहे. मात्र त्या नंतर आजपर्यंत मोठे राजकीय यश स्थानिक पातळीवर पदरात पडलेले नाही.

ही मंडळी जरी एकमेकांच्या विरोधात भांडत असली तरी ती राजकीय दृष्ट्या कधीही एकमेकांच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. या एकमेकांशी भांडणाऱ्या राजकीय घराण्यांमधील व्यक्ती एकमेकांच्या विरोधात कधीही उभ्या राहिलेल्या नाहीत. ही बाब जनतेला नेहमीच खटकते आणि आम्ही देखील त्याच्याशी सहमत आहोत. फक्त दोन्हीकडून कार्यकर्त्यांना झुंजविले जात असल्याचे आरोप सामान्य नागरिक करतात ही बाब देखील तेवढीच स्पष्टपणे जाणवणारी आणि खटकणारी देखील आहे.

सुडाच्या आणि द्वेषाच्या राजकारणाचा प्रवास आणि शिरकाव देखील नगर जिल्ह्याच्या राजकारणात झाला आहे. एकेकाळी एकमेकांवर फक्त आरोप केले जायचे. आता तुरुंगात टाकण्यापर्यंतच्या स्थितीत आपण पोहोचलेलो आहोत. आपल्याला समर्थन मिळत नाही ना ? कायम विरोध करतो ना, आपल्या विरोधात लढतो ना ? तर मग समोरच्याला राजकारणात थेट संपवून टाकण्यासाठी आता सरकारी सत्तेचा वापर केला जात असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. सत्ता कोणाचीही असो सगळेजण तेच करतात.

देशपातळीवर, राज्य पातळीवर हे घडत असताना त्याचे लोन आता जिल्हा पातळीसह ग्रामीण भागात थेट ग्रामपंचायत पातळीपर्यंत येऊन पोहोचले आहे. हे नगर जिल्ह्याच्या राजकारणाचे दुर्दैव म्हणावे लागेल. एकेकाळी प्रचंड राजकीय संघर्ष असताना, एकमेकांचे विरोधक असताना स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील, भाऊसाहेब थोरात, शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, वकीलराव लंघे, पी.बी. कडू पाटील, मधुकरराव पिचड, शिवाजीराव नागवडे यशवंतराव गडाख अशा दिग्गज मंडळींनी एकमेका विरोधात टोकाचे राजकारण केले असले तरी त्यांनी सुडाचे आणि द्वेषाचे राजकारण मात्र कधीच केले नाही. हेही तेवढे नोंद घेण्यासारखे आहे. आज कालची पिढी आणि याच सर्व घराण्यांमधील सत्तेत असलेले आणि सत्तेच्या चाव्या हातात असलेले त्यांचे वारसदार या बाबींची नोंद कधी घेईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

