आटपाट नगरीतल्या महासभेसाठी पूर्वेच्या महाराजांची सर्व विभागातून जोरदार ‘वसुली’ मोहीम !

एका धरणाच्या आणि कालव्यांच्या निर्मितीच्या श्रेयासाठी महाराजांचा आटापिटा !

विशेष प्रतिनिधी —

आटपाट नगराच्या पश्चिमेला अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या एका धरणाचे काम एकदाचे पुरे झाले. त्यानंतर त्या धरणापासून दोन कालवे काढण्यात आले. डावा आणि उजवा म्हणून हे कालवे प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे कालव्यांचे काम अर्धवट असून त्याबाबत अनेक समस्या आहेत. या परिसरात असणाऱ्या शेतकरी रयतेच्या विविध मागण्या आहेत. तरीही श्रेयवादाची लुटूपुटू ची लढाई दोन्ही महाराजांमध्ये सुरूच आहे.

या सर्व निर्मितीचे श्रेय लाटण्यासाठी आटपाट नगरीच्या वेगवेगळ्या दोन महाराजांमध्ये आणि त्यांच्या लाभार्थ्यांमध्ये नेहमीच संघर्ष चालू असतो. मात्र पूर्वेकडच्या महाराजांनी आता हे श्रेय लाटण्यासाठी अक्षरशः पूर्ण इलाख्याच्या प्रधान सेवकालाच बोलवून जलपूजन आणि रयतेला अर्पण करण्याचा घाट घातला आणि हे श्रेय आपल्यालाच कसे मिळेल असा डाव टाकला. यावरून महाराजांवर टीका टिप्पण्या तर चालूच आहेत.

जे महाराज ‘मी ते धरण पूर्ण केले असे सांगत असतात त्यांच्या आटपाट नगरीत सोशल मीडिया वरून टोमणे मारण्याचे काम सुरू आहे. अर्थात आटपाट नगरीत हे टोमणे दोन्ही गटांकडून नेहमी सुरूच असतात. ‘आयत्या बिळावर नागोबा’, ‘श्रेय लाटण्यासाठी आणले अवघ्या विश्वाचे गुरु’ अशा विविध गमतीशीर टीका सोशल मीडियातून केल्या जात आहेत.

अर्थात हे धरण कोणी बांधले हे दोन्ही आटपाट नगरीच्या रयतेला चांगलेच ठाऊक आहे. या कालव्यांमधून कोणाला पाणी मिळणार आहे हे शेतकऱ्यांना देखील चांगलेच ठाऊक आहे. धरणाचे आणि कालव्याचे राजकारण अनेक वर्षापासून सुरू आहे. जशी धरणाच्या कालव्यांना गळती लागली तसेच गळतीचे ‘टिपटिप पाणी’ महाराजांच्या लाभार्थ्यांकडून टिके साठी ‘फव्वारे’ म्हणून उडवले जात आहेत.

मुळात सहकार आणि शिक्षणाच्या उरावर बसून ‘पोसलेले’ हे दोन्ही आटपाट नगरीचे महाराज रयतेसाठी नेमके काय करतात हा एक संशोधनाचा विषय आहे. आटपाट नगरीतील इतर विकासाची कामे ही धरणाच्या राजकारणात वळकटीसारखी गुंडाळून टाकलेली दिसून येतात. दोन्ही महाराजांच्या आटपाट नगरात मूलभूत समस्यांचे ढीग पडले आहेत. यावर बोलण्यास मात्र दोन्ही महाराज आणि त्यांचे चेले, लाभार्थी, पदाधिकारी, गाव पुढारी सोयीस्कररित्या दुर्लक्ष करतात. सोशल मीडियावर शाब्दिक लढाया करायच्या आणि संघर्षाच्या बाता मारायच्या एवढा एकच उद्योग या मंडळींचा सुरू असतो.

दोन्ही महाराज सहकुटुंब सहपरिवार धनवान आणि समृद्ध झाले आहेत. नातेवाईक, भाऊबंद, सगेसोयरे विशेषत: ‘जावई मंडळी’ या सर्वांचे भले झाले आहे. सर्वच क्षेत्रात त्यांचा दबदबा आहे. सर्व सामान्य रयत मात्र आहे तेथेच आहे. आजही रयतेला पाण्यासाठी, चांगल्या आणि हक्काच्या शिक्षणासाठी, आरोग्य आणि औषध उपचारांसाठी भटकावे लागते. पाण्यापासूनही रयत वंचित आहे. पाण्याचा राजकारणासाठी मात्र वापर होत आहे. पूर्वेकडच्या महाराजांच्या साखरेच्या कहाण्या देखील ‘कडू’ झाल्या आहेत.

तर….धरणाच्या कालव्याच्या जलपूजना साठी आणलेले अवघ्या इलाख्याचे प्रधान सेवक यांच्या महासभेला रयतेची गर्दी खेचण्यासाठी पूर्वेकडेच्या महाराजांनी चांगलाच आटापिटा केला. अनेकांना फर्मान सुटले. येणाऱ्या सर्वांची नाश्ता, चहा पाण्याची, खाण्यापिण्याची आणि प्रवासाची मोफत सोय केली जाणार असल्याचे लाभार्थ्यांकडून सोशल मीडियावर पोस्टद्वारे जाहीर करण्यात आले. तशी सोयही झाली.

या साठी शासकीय अधिकाऱ्यांना, कोतवालीतील कोतवालांना, राजाच्या वसुली अधिकाऱ्यांना विविध टप्प्यांमध्ये खर्च करण्यास आणि खजिन्यात भर घालण्यास सांगितले. विशेष म्हणजे यामध्ये आटपाट नगरीच्या जनपालिका आणि त्यांचे मुख्य अधिकारी देखील सुटलेले नाहीत. वेगवेगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून, भालदार, चोपदारांकडून विविध खर्चासाठी वसुली करण्यात आलेली आहे. वेगवेगळे खर्च करण्याच्या जबाबदाऱ्या देखील देण्यात आल्या. हे काम पूर्वेकडच्या महाराजांना चांगलेच जमत असल्याची चर्चा देखील आटपाट नगरीत सुरू आहे. त्यामुळेच तर आटपाट नगरीतील पूर्वेकडच्या युवराजांवर ‘चहापाण्याची आणि ढाब्याची’ व्यवस्था करण्याचे आदेश ‘महाराजांच्या मालकांनी’ मागेच दिले आहेत.

काही झाले तरी आटपाट नगरीतला हा जलपूजन सोहळा आणि रयत लोकार्पण सोहळे खर्चिक, आनंदात आणि प्रसिद्धीच्या झोतात पार पडला. परंतु ‘ज्यासाठी केला होता एवढा अट्टाहास’ तो मात्र महाराजांचा आणि युवराज यांचा साधा नामोल्लेख न केल्यामुळे राहून गेला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!