घारगांव पोलीस ठाणे हद्दीतील खून प्रकरण….
खून होऊन सहा महिने झाले… संशयीतांची ‘लाय डिटेक्टर चाचणी’ देखील झाली… तरीही आरोपी सापडत नाही !
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पठार भागात घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वयस्कर व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेला सहा महिने झाले. पोलिसांनी काही संशयित आरोपींची लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी सुद्धा केली. तरीही पोलिसांना अद्यापही खुनी सापडला नसून पोलिसांचे अपयश उघड झाले आहे.

फक्त गुन्हे दाखल करून पुढील तपासात काहीही निष्पन्न होत नसल्याचे प्रकार अथवा निष्पन्न न करण्याचा निष्काळजीपणा संगमनेर तालुक्यातील पोलिसांकडून होत आहे. यामध्ये घारगाव पोलीस ठाण्यासह संगमनेर शहर, संगमनेर तालुका आणि आश्वी पोलीस ठाणे देखील तेवढेच निष्काळजी असल्याचे आढळून येत आहे.

घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा महिन्यांपूर्वी एका वयस्कर व्यक्तीचा त्याच्याच राहत्या घरी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला होता. पोस्टमार्टम नंतर सदर व्यक्तीचा धारदार शस्त्राने छातीवर, पाठीवर आणि हातावर वार करून, गंभीर दुखापत करून खून झाल्याचे निष्पन्न झाले होते.

घारगाव पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पुन्हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या सहा महिन्यापासून या खुनाचा तपास सुरू असून अज्ञात आरोपी अद्याप सापडलेला नाही. या खुनामध्ये किती आरोपी सहभागी आहेत ? त्यांची संख्या किती आहे ? हे सुद्धा पोलिसांकडून अद्याप पर्यंत निष्पन्न झालेले नाही. सुमारे आठ ते नऊ जणांची या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली आहे.

दरम्यान बऱ्याच संशयीतांची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. यामध्ये काही संशयतांना परस्पर ताब्यात घेऊन त्यांची थेट ‘लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी’ देखील पोलिसांनी करून टाकली असून त्यातून देखील पोलिसांच्या हाती काहीच लागले नसल्याचे माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विनाकारण काही संशयतांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशी आणि चाचणी केल्याने ते मानसिक तणावा खाली असल्याचे समजले. तसेच पोलिसांच्या या तपास पद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

त्यामुळे एकंदरीत या खुनाच्या तपासात पोलिसांकडून ‘साप साप म्हणत भुई धोपटायचे’ काम सुरू असल्याचे बोलले जात आहे. की तसे दाखवले जात आहे ? हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलिसांचा तपास नेमका कोणत्या दिशेने चालू आहे असा प्रश्न उपस्थित झाला असून ‘लाय डिटेक्टर (पॉलीग्राफ) चाचणी’ बाबतही यातील तज्ज्ञ व्यक्तींकडून शंका व्यक्त होत आहेत.

