डिझेलची बेकायदेशीर चोरटी विक्री करणाऱ्या अड्ड्यावर संगमनेर पोलिसांचा छापा !
हजारो लिटर डिझेल पकडले ; दोघांवर गुन्हा दाखल
पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
प्रतिनिधी —
संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर असणाऱ्या चंदनापुरी शिवारात हॉटेल पांडुरंग समोर एका बंद ढाब्याच्या पाठीमागे बेकायदेशीर डिझेल विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेर विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली. त्यांनी सदर माहिती संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला कळवून संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने त्या ठिकाणी छापा मारून अवैधरिता चालू असलेला डिझेल पंप बंद केला आहे. दोघांवर गुन्हा दाखल केला असून या ठिकाणी डिझेलची असुरक्षित रित्या अवैध चोरटी विक्रीहोत असल्याचे आढळून आले आहे.

सोजित्रा भावीनकुमार आनंद भाई (वय २९, रा. आकृती बंगलोज, कॅनॉल रोड, कामरेज, सुरत, गुजरात – सध्या रा. गाभण वाडी, गट नंबर २१८ चंदनापुरी तालुका संगमनेर) तसेच जागा मालक नितीन सुनील गोसावी (रा. संगमनेर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ लाख ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे यामध्ये २१ हजार लिटर डिझेलचा समावेश आहे.

नाशिक पुणे महामार्गावरील जावळे वस्ती जवळ चंदनापुरी शिवार या ठिकाणी हॉटेल पांडुरंगच्या पुढे डाव्या बाजूस एका बंद पडलेल्या ढाब्याच्या पाठीमागे अवैधरीत्या डिझेल पंप चालवून डिझेलची विना लायसन्स बेकायदेशीर चोरटी विक्री होत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस हवालदार एस एन मालुंजकर यांच्यामार्फत पोलीस निरीक्षक देविदास ढोमणे यांना ही माहिती कळविली. त्यानंतर पोलिसांनी तहसीलदार कार्यालयातील पुरवठा अधिकारी गणेश भालेराव यांच्यासह घटनास्थळी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी अवैध डिझेल साठा व चोरटी डिझेल विक्री होत असल्याचे दिसून आले.

हिवरगाव पावसा टोल नाक्याच्या पुढे अंदाजे अर्धा किलोमीटर गेल्यानंतर पांडुरंग हॉटेलच्या विरुद्ध दिशेस एका पडीत ‘सुरत काठीयावाडी’ नावाच्या बंद ढाब्याच्या मागे मोकळ्या जागेत सदर अवैध व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. या ठिकाणी मोठ्या टँकरची टाकी जमिनीवर ठेवलेली होती. ही टाकी प्लास्टिकने झाकून ठेवलेली आढळून आली. तसेच या टाकी मधून पाईपलाईन करून लगत असलेल्या एका पत्र्याच्या शेडमध्ये प्लास्टिक टाक्यांमध्ये डिझेल भरून ठेवलेले दिसून आले. तसेच इलेक्ट्रॉनिक मोटर्सच्या सहाय्याने हे डिझेल ओढून त्याची विक्री करण्यात येत होती. डिझेल भरण्यासाठी या ठिकाणी एक मशीन जोडलेले होते त्यास इलेक्ट्रिक सप्लाय देऊन पोलिसांनी तपासून पाहिले असता ७७ रुपये लिटर असे रिडींग आले आहे .

तेथील इसमास विचारले असता त्याने नाव सोजित्रा भाविनकुमार आनंदभाई असे सांगितले. या जागेचा मालक संगमनेर येथील नितीन सुनील गोसावी आहे. या ठिकाणी बेकायदेशीर रित्या डिझेल इंधन विक्री होत असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याने पुरवठा अधिकारी गणेश भालेराव यांच्या समक्ष सर्व पंचनामा करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. १८ लाख रुपये किंमतीचे २१ हजार लिटर डिझेल आढळून आले. तसेच ५ लिटर क्षमतेची एक व दोन दोन हजार लिटर क्षमतेच्या दोन प्लास्टिक टाक्या आढळून आल्या. तसेच तीन हजार लिटरची एक लोखंडी टाकी देखील आढळून आली. सदरचे डिझेल प्रति लिटर ७७ रुपये विक्रीने दराने विकले जात असल्याची माहिती समजली.

एकूण १८ लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. डिझेल सॅम्पल काढून घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. इंधनाचा असुरक्षितरित्या बेकायदेशीर साठा करून चोरटी विक्री केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार सचिन कचरू उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान कलम ४२०, २८५ आणि ३४ तसेच जीवनाशक वस्तूंचा अधिनियम १९५५ चे कलम ३ उल्लंघन ७ प्रमाणे व मुंबई वजन मापे अंमलबजावणी अधिनियम १९५८ चे कलम २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

