सातासमुद्रापार गणेश उत्सव – ग्लासगो इंडियन्स ची शोभायात्रा !
संस्कृती जिवंत ठेवण्याचा आमचा उद्देश…
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
महाराष्ट्रातच नव्हे तर देशातल्या अनेक घरांमध्ये पोहोचलेला गणेशोत्सव त्यातून होणारी सामाजिक, सांस्कृतिक कामे, संस्कृती जतन करण्याचे प्रयत्न याबाबत चर्चा, प्रसिद्धी नेहमी होतच असते. मात्र हीच संस्कृती जतन करण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न भारताबाहेर परदेशातही ग्लासगो इंडियन्सच्या ग्रुपने केला आहे.

सातासमुद्रापार राहूनही आपली संस्कृती जिवंत ठेवण्यात जो आनंद असतो तो कदाचित इतर कशातही मिळत नाही आणि ही संस्कृती जिवंत ठेवण्याची जबाबदारी घेतलेल्या Scotland Glasgow येथील ग्रुपचे नाव आहे “ग्लासगो इंडियन्स” ग्रुप.

संस्कृतीला पुढे नेण्यासाठीचे उत्तम माध्यम गणेशोत्सवापेक्षा चांगले काय असू शकते? या गणेशोत्सव शोभे यात्रेसाठी जसा विद्यार्थी परीक्षेपूर्वी कठोर परिश्रम करतो, त्याचप्रमाणे ग्लासगो इंडियन्स ग्रुपचे स्वयंसेवक अनेक महिने आधीच त्यांचे नियोजन आणि तयारी सुरू करतात !

ढोल ताशाचा सराव असो, झांज पथकाचे संयोजन असो, लेझीमवर नाचण्याची कला असो किंवा ध्वज पथकाच्या खास सादरीकरणाची तयारी असो ग्लासगो इंडियन ग्रुपचे उद्दिष्ट हे आहे की, लोकांना आपल्या देशापासून दूर असतानाही आपल्या देशाबद्दल अभिभुती करून देणे.

यावर्षी ग्लासगो इंडियन्स च्या ग्रुपने हिंदू मंदिराच्या सहकार्याने गणेश उत्सव मिरवणुकीत पारंपारिक पोशाखात भाग घेतला. जो ग्लासगो शहरातील अतिशय प्रसिद्ध जॉर्ज स्क्वेअरपासून सुरू झाला आणि हिंदू मंदिरात संपला. स्कॉटिश लोकांसाठी हे एक अतिशय आश्चर्यकारक आणि मनोरंजक दृश्य होते. या भारतीय संस्कृतीचा एक छोटासा पैलू पाहणे हेच जणू त्याच्यासाठी भारताचे दर्शनच होते.

ही ग्लासगो इंडियन्सची शोभायात्रा ब्रिटन मधील सर्वात पहिली आणि मोठी शोभायात्रा ठरली. या शोभायात्रेत २०० हून अधिक वादक होते ज्यांनी ढोल, ताशा, लेझीम आणि ध्वज पथक सादर केले. शोभायात्रेत मोठ्या संख्येने भारतीय आणि स्थानिक स्कॉटिश लोकांनीही सहभाग घेतला आणि ती यशस्वी केला.

संगमनेर मधील चेतन नाईक आणि त्यांच्या पत्नी अवंती नाईक यांनी देखील ढोल ताशा मधे सहभाग घेऊन ‘सौ शहरी एक संगमनेरी’ या संगमनेरी बाण्याचा प्रत्यय दर्शविला. चेतन नाईक यांचा ग्लासगो इंडियन्सच्या शोभा यात्रेच्या आयोजनात सक्रिय सहभाग होता.

