संगमनेर मध्ये ईद-ए-मिलाद उत्साहात साजरा !
भव्य मिरवणुकीत समाजाचा मोठा सहभाग
प्रतिनिधी —
इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती (ईद-ए-मिलाद) शहर व परिसरात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. शुक्रवारी मुस्लिम बांधावांच्या वतीने शहरातील विविध भागातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने मुस्लीम सहभागी झाले होते. मिरवणूक मार्गावरील आकर्षक सजावटीने लक्ष वेधून घेतले.

(सर्व छायाचित्रे- शाविद शेख)
ईद-ए-मिलाद हा सण मुस्लीम बांधवांकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. दरवर्षी यानिमित्ताने मशिदींसह घरे, दुकाने व परिसरात सजावट करण्यात येते. मागील आठवडाभरापासून शहरातील मुस्लीम बहुल भागात लगबग पहावयास मिळत होती.

शुक्रवारी दुपारी नमाज पठण झाल्यानंतर शहरतील जामा मशिद येथून मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ करण्यात आला. ही मिरवणूक देवीगल्ली मोगलपुरा, सय्यदबाबा चौक, गवंडीपुरा मस्जिदसमोरुन नाशिक पुणे हायवेवरुन नवघरगल्ली , बागवानपुरा, मोमीनपुरा , जुने तहसिल कार्यालय , माळीवाडा , नगरपालीका , साळीवाडा रंगारगल्ली, जे. पी. रोड, गांधी चौक ,तेलीखुंट ,मोगलपुरा देवीगल्ली , नाईकवाडपुरा, जामा मस्जिद येथे समाप्त झाली.

मिरवणूक मार्गावर लहानग्यांना पारंपरिक पोशाखात तयार करण्यात आले. तसेच परिसरात हिरवे ध्वज, पताका, विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली होती. नमाजपठणानंतर मशिदींमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. शहरातील मशिदी, मदरशांमध्ये सामूहिक कुराणपठण, पैगंबरांवर अधारित काव्यपठण, दरुदोसलामचे पठण करण्यात आले.

पोलीस अधीक्षक राकेश ओला अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांनी देखील संगमनेरला भेट दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

