सांदण दरीत अडकलेल्या पर्यटकांची सुटका !

प्रतिनिधी —
आज दुपारी अचानक आलेल्या वादळीवारा व मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरण परिसरातील आशिया खंडातील दोन नंबरची खोल दरी असलेल्या सांदण दरी मध्ये अडकलेल्या असंख्य पर्यटकांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने सुखरुप बाहेर काढले.

शनिवार, रविवार सुट्टी व भंडारदरा धरण परिसरात सुरु असलेला काजवा महोत्सवचा आनंद उपभोगण्यासाठी सद्या तोबा गर्दी होतआहे. परिसराला जत्रेचे स्वरुप निर्माण झाले आहे. जिकडेतिकडे पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ वाढलेली पाहावयास मिळत आहे.

यातील काही पर्यटकांनी शनिवारी रात्री काजवा महोत्सवाचा आनंद घेऊन रविवारी दुपारी आशिया खंडातील दोन नंबरची खोल दरी असलेल्या सांदण दरीचा आनंद घेण्यासाठी दरी मध्ये उतरले होते.

परंतु दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली व पाण्याचा ओघ वाढु लागला. त्यामुळे दरी मध्ये असलेल्या पर्यटकांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे दरीमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला. त्यामुळे पर्यटन घाबरले व आरडा ओरडा करू लागले. या दरम्यान तेथे गस्तीवर असलेले वनविभागाचे वनसंरक्षक महिंद्रा पाटील, दिवे यांना घटनेची माहिती मिळाली.

त्यांनी तात्काळ मदत कार्यासाठी धाव घेत स्थानिक नागरिक व गाईड यांच्या मदतीने अडकलेल्या पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. पर्यटकांमध्ये तरुणांबरोबर मुली महिलांची संख्या मोठी होती.

मान्सूनला या परिसरात लवकर सुरुवात होणार आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर ओढे, नाले लहान मोठ्या दरी आहेत. पर्यटकांनी अशा ठिकाणी जाताना काळजी घ्यावी. शक्यतो पाण्याचा अंदाज नसल्यास अशा ठिकाणी पाण्यात जाऊ नये व जीवास धोका उत्पन्न होईल अशी कृती करू नये. असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

