अकोले तालुक्यात लवकरच क्रीडा संकुल —       आमदार डॉ. किरण लहामटे

आमदार लहामटे – भांगरे खेळणार क्रिकेट !

प्रतिनिधी —

अकोले तालुक्यातील क्रीडा क्षेत्राला चांगली चालना मिळण्यासाठी आणि आदिवासी ग्रामीण भागातील सर्व खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय पातळीवर क्रीडा क्षेत्रात संधी मिळवण्यासाठी उत्कृष्ट क्रीडा संकुलाची निर्मिती लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिली आहे.

संगमनेर व अकोले तालुक्यातील ज्येष्ठ क्रिकेट खेळाडूंनी एकत्र येत सिनयर क्रिकेटर्स क्लब ची स्थापना केली आहे. भंडारदरा येथे या क्लब चे पहिले गेट-टुगेदर पार पडले. त्यावेळी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आमदार डॉ. लहामटे यांनी खेळाडूंची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

संगमनेर अकोलेतील या जेष्ठ क्रिकेट खेळाडूंनी वारंवार आमदार किरण लहामटे यांच्याकडे संपर्क करून तालुक्यासाठी एक चांगले क्रीडा संकुल असावे अशी मागणी केली होती. आज लहामटे यांनी क्रीडा संकुलाची माहिती देत सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला.

यासाठी अकोले तालुक्यातील एक चांगली जागा दोन चार महिन्यात मिळणार असल्याचेही आमदार लहामटे यांनी स्पष्ट केले.

या स्नेह भेटीच्या वेळी संगमनेर अकोले तालुक्यातील क्रिकेट खेळाडू उपस्थित होते. अजिंक्य कला व क्रीडा संवर्धन मंडळाचे राजा दैवज्ञ, नंदू विसाळ, हेमंत दराडे, हेमंत चव्हाण, राजेंद्र मंडपमाळवी, श्याम मुंदडा, सतीश मालवणकर, पांडुरंग हुजबंद, अण्णा संत, राजा शेटे, नंदू भांगरे, मकरंद संत, राजेंद्र देशमुख, दिलीप क्षीरसागर, संगमनेर मधील रणजीत, सुप्रीम, सम्राट, सुपर डायमंड, एन्जॉय, नेहरू चौक, जयहिंद, युनिटी याच बरोबर विविध संघांकडून क्रिकेट खेळलेले प्रतिनिधी, ज्येष्ठ खेळाडू राजा वराट, श्याम साळवी, प्रशांत वामन, ॲड. सुहास आहेर, सुनील गुंजाळ, राजा गुंजाळ अनिल ताजणे, कैलास वाकचौरे, विनोद देशमुख, कुंदन लहामगे आदी सहकारी उपस्थीत होते.

मानवाच्या जीवनात व्यायामाला खूप महत्त्व आहे. आरोग्य नसेल तर आनंदी जीवन जगण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यामुळे जंगलात भटकंती करणे, ट्रेकिंगल जाणे, पोहायला जाणे, चालायला जाणे, विविध खेळ खेळणे हे आवश्यक असते. आम्ही सुद्धा लहानपणी विविध खेळात भाग घ्यायचो. आजही मी मित्रांबरोबर ट्रेकिंगला जातो. निसर्गात जगण्याचा आनंद मिळतो असे सांगतच आमदार लहामटे पुढे म्हणाले की, आज तुम्ही मित्रांना इतक्या वर्षानंतर एकत्र येऊन भेटलात. हे दोन दिवस तुम्हाला जीवनातले पूर्ण आनंद देणारे ठरतील. मित्रांबरोबरचे गेट-टुगेदर आनंदी जीवन जगण्याची ऊर्जा पुरवत असते. हा असा आनंद तुम्हाला कुठेही विकत मिळणार नाही. तुम्ही जो आनंद घेत आहात तो कायम घेत राहा. अशा शुभेच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

अकोले तालुक्यातील विकासाची कामे प्राधान्याने सुरू केलेली आहेत. प्रत्येक तालुक्याला एमआययडिसी आणि क्रीडा संकुल असे पूर्वी सरकारचे धोरण होते. परंतु ते का झाले नाही, हा जरी संशोधनाचा विषय असला तरी मागच्या घटनांकडे वळून न पाहता आपल्याला पुढे जायचे आहे. त्यामुळे तालुक्यातील विकासाची कामे सातत्याने होत राहणार आहेत. ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक चांगले क्रीडा संकुल लवकरात लवकर सुरू करण्याचा त्यासाठीच प्रयत्न सुरू आहे. या क्रीडासंकुलात बॅडमिंटन हॉल, बास्केटबॉल कोर्ट, ४०० मीटर धावण्याच्या ट्रॅक, ज्येष्ठ लोकांसाठी चालण्यासाठी, फिरण्यासाठी ट्रेक आणि क्रिकेट साठी मोठे क्रीडांगण व विविध योजना, सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असून यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांची सपत्निक क्रिकेट मॅचला भेट —

संगमनेर व अकोले सिनियर क्रिकेटर्स क्लब यांनी या गेट-टुगेदर मध्ये क्रिकेटचा सामना आयोजित केला होता. हा क्रिकेटचा सामना चिचोंडी येथील कॉलेजच्या मैदानावर आनंदात आणि मजेत पार पडला. या क्रिकेट सामन्याला अकोल्याचे ज्येष्ठ नेते अशोक भांगरे यांनी आवर्जून सपत्नीक भेट दिली. तसेच खेळाडूंबरोबर चर्चादेखील केली. स्वतः क्रिकेट खेळण्याचा थोडासा आनंद घेतला आणि अकोले तालुक्यातील खेळासाठी क्रिकेट मैदान मिळवून देण्यासाठी आपण सुद्धा विशेष प्रयत्न व सहकार्य करणार आहोत. आम्ही सुद्धा तुमच्या सोबत आहोत असे आश्वासन दिले.

आमदार लहामटे -भांगरे खेळणार क्रिकेट !

संगमनेर  व अकोले सिनियर क्रिकेटर्स क्लब चे गेट-टुगेदर सातत्याने होत राहो. त्याचे ठिकाण अकोले तालुक्यातच असू द्या. पुढच्या गेट-टुगेदर ला आम्ही दोघेही तुमच्या सोबत क्रिकेटची मॅच खेळायला येऊ असे आश्वासन आमदार डॉ. किरण लहामटे आणि अशोक भांगरे यांनी दिले.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!