जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत ध्रुव ग्लोबलचा संघ अजिंक्य !

 प्रतिनिधी —

सहोदया संगम चॅप्टरच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. संगमनेरच्या अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यजमान अमृतवाहिनी आणि ध्रुव ग्लोबलच्या संघात अंतिम सामना रंगला होता, त्यात उत्कृष्ट फलंदाजीच्या जोरावर ध्रुवच्या संघाने यजमानांवर तब्बल सहा गडी राखून विजय मिळवला.

दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेचे यजमानपद अमृतनगरच्या अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलकडे होते. स्पर्धेतील साखळी सामन्यात विजयाची श्रृंखला सुरु करणार्‍या ध्रुव ग्लोबलच्या संघाने स्ट्रॉबेरी स्कूलच्या संघाचा २० धावांनी पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघासोबत झालेल्या उपांत्य लढतीतही ध्रुवच्या क्रिकेटपटूंनी आपल्या कामगिरीत सातत्य राखत उत्कृष्ट फलंदाजी करीत सात गडी राखून विजय मिळविला व अंतिम सामन्यात प्रवेश केला.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ध्रुव ग्लोबल स्कूल विरुद्ध यजमान अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल अशी लढत रंगली होती. अंतिम सामना अतिशय चुरशीचा आणि रंगतदार होईल अशी अपेक्षा असतांना धावांचा पाठलाग करणार्‍या ध्रुवच्या संघाने ती फोल ठरवित अंतिम सामनाही एकतर्फी ओढला आणि तब्बल सहा गडर राखून दणदणीत विजय मिळविला. गटशिक्षणाधिकारी के.के.पवार यांच्या उपस्थितीत विजेत्या संघाला पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

अजिंक्य ठरलेल्या ध्रुव ग्लोबलच्या संघाकडून खेळतांना ध्रुव दीपेश भंडारी, संकेत चंद्रकांत देसले, भार्गव शक्ती दळवी, शिवम नितीलाल दळवी, रुचीर नितीन ब्राह्मणकर, ओम रविंद्र घाटकर, कृष्णा सुरेश लामधाडे, कृष्णा संतोष मोर्डे, वेदांत विजय माळी, ओम संतोष म्हाळसकर, युवराज गणेश पाटील व दीप विशाल पडताणी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. ध्रुव ग्लोबलचे क्रिकेट प्रशिक्षक महेश जंगम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ध्रुव ग्लोबलच्या संघाने मिळविलेल्या या यशाबद्दल चेअरमन डॉ.संजय मालपाणी, व्हा.चेअरमन गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व क्रीडा विभागाचे प्रमुख गिरीश टोकसे यांनी अभिनंदन केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!