संगमनेरला राष्ट्रीय योगासन स्पर्धेच्या यजमानपदाचा बहुमान !
डॉ.संजय मालपाणी यांची माहिती; देशभरातील सातशेहून अधिक स्पर्धकांचा सहभाग
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
जिल्हा व राज्यस्तरीय योगासन स्पर्धांचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आता संगमनेरला सहाव्या राष्ट्रीय पातळीवरील सब-ज्युनिअर व सिनिअर ‘बी’ योगासन क्रीडा स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. योगासन भारत व महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय स्पर्धा येत्या 29 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमधील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आल्याची माहिती योगासन भारतचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी दिली.

पाच दिवस चालणार्या या स्पर्धेसाठी देशभरातील 28 राज्यांमधून सुमारे सातशेहून अधिक योगासनपटू, त्यांचे प्रशिक्षक, शिक्षक तसेच, राष्ट्रीय व राज्यस्तरीय योगासन संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. या सर्वांच्या निवासासह खाण्या-पिण्याची संपूर्ण व्यवस्था ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये करण्यात आली असून शाळेला ‘योगासन नगरी’चे स्वरुप प्राप्त होवू लागले आहे. संगमनेरच्या स्पर्धा आयोजनाचा पॅटर्न विचारात घेवून ‘राष्ट्रीय’ स्पर्धेच्या यजमानपदाचा बहुमान मिळाल्याने आयोजनात कोणतीही कमतरता राहणार नाही यासाठी विविध समित्यांद्वारा प्रत्येक गोष्टीचे नियोजन केले जात असल्याचेही डॉ.मालपाणी यांनी सांगितले.

केंद्र सरकारने भारतीय पारंपरिक योगासनांना खेळाचा दर्जा दिल्यानंतर त्याचा व्यापक प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने तालुकास्तरापासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंतच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी संगमनेरमध्ये जिल्हा व राज्यस्तरीय योगासन स्पर्धांचे यशस्वी आयोजन झाले. प्रत्येक गोष्टीचे नेटके नियोजन, प्रशस्त क्रीडा संकुल, एकाचवेळी वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा घेण्याची सुविधा, मोठ्या संख्येने येणार्या पाहुण्यांच्या निवासासह त्यांच्या भोजनासाठी प्रशस्त कक्ष, विस्तीर्ण प्रांगण या गोष्टीतून स्पर्धा आयोजनाचा संगमनेर पॅटर्न विकसित झाला. त्याचाच परिणाम जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनानंतर संगमनेरला राष्ट्रीय स्पर्धेच्या आयोजनाचा बहुमान मिळाल्याचे स्पर्धा व्यवस्थापक कुलदीप कागडे यांनी सांगितले.
