अतिदुर्गम भागात आरोग्यसेवा देणारे एसएमबीटी हे वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श मॉडेल – रॉनी स्क्रुवाला
टेलीहेल्थ सेवेचा शुभारंभ; एसएमबीटी हॉस्पिटल व स्वदेस फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करताना आजही ग्रामीण आणि सुदूर भागात आरोग्याचे मोठे आव्हान आहे. अतिदुर्गम भागात रस्ते, प्रवासाच्या सुविधा यांचा अभाव आणि रोजगारासाठी स्थलांतर अशी परिस्थिती आहे. अशा प्रतिकूल भागात दरवर्षी ६०० पेक्षा अधिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करणारे आणि उत्तम आरोग्यसेवा प्रदान करणारे एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल हे वैद्यकीय क्षेत्रातील आदर्श मॉडेल आहे. महाविद्यालयातर्फे आयोजित “रूबरू” या विशेष प्रकट मुलाखत कार्यक्रमात प्रसिद्ध उद्योजक, चित्रपट निर्माते आणि स्वदेस फाउंडेशनचे संस्थापक रॉनी स्क्रूवाला यांनी गौरवोद्गार काढले. यावेळी एसएमबीटीच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगांवकर, उपअधिष्ठाता डॉ. धनाजी जाधव, सीओओ सचिन बोरसे, प्रसिद्ध कर्करोगतज्ञ डॉ. हसमुख जैन यांच्यासह संस्थेचे वरिष्ठ पदाधिकारी, शिक्षक विद्यार्थी आणि डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसएमबीटी आणि स्वदेस फाउंडेशन यांच्यातील दोन वर्षांपासून सुरु असलेल्या विविध संयुक्त उपक्रमांचा भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. एमबीबीएसच्या दोन प्रशिक्षणार्थी डॉ. अस्मी बोरा आणि डॉ. अंकिता मजुमदार यांनी ही प्रकट मुलाखत घेतली व श्री. स्क्रूवाला यांचा जीवनप्रवास, तत्वज्ञान, आव्हाने आणि ग्रामीण भारताबाबत असलेला दृष्टीकोन यावर संवाद साधला. केवळ संपत्ती जमा करण्याऐवजी समाजासाठी दीर्घकालीन मुल्ये निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करणे आणि अपयश हे शिकण्याचा आवश्यक अनुभव म्हणून सकारात्मकपणे पुढे जाणे यावर त्यांनी प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, हा प्रवास इथेच थांबलेला नसून समाजाच्या अखेरच्या घटकापर्यंत पोहोचायचे आहे, शिक्षित करायचे आहे. प्रत्येकाला स्वावलंबी बनवून हा समाज घडवायचा आहे. माझ्या आयुष्यात अनेक चढउतार आले अनेकांनी चित्रपट बनवताना अनेक सल्ले दिले प्रसंगी वेड्यात काढले. परंतु, आपले ध्येय ठरलेले होते. आपल्याला कुठे पोहोचायचे आहे? हे निश्चित होते. त्यादृष्टीने प्रयत्न करण्याचे थांबवले नाहीत. माणसं भेटत गेली आणि स्वदेसचे सुंदर विश्व निर्माण होत गेले.

पुढे बोलताना स्क्रूवाला यांनी ग्रामीण भागातील आरोग्यविषयक आव्हानांवर प्रकाश टाकला. यावर मात करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील युवकांचा सहभाग आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जाणीवजागृतीची नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
याप्रसंगी स्क्रूवाला यांच्या हस्ते एसएमबीटीच्या टेलीहेल्थ मोबाईल ॲपचे अनावरण करण्यात आले. या उपक्रमात ६०० हून अधिक ‘स्वदेस मित्र’ आणि एसएमबीटीचे डॉक्टर सक्रिय सहभाग घेत आहेत. अत्याधुनिक टेलीहेल्थ सेवेच्या माध्यमातून, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आता थेट रुग्णांच्या दारी पोहोचणार आहे. ग्रामीण विकासासाठी समर्पित असलेल्या स्वदेस फाउंडेशनला एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे दुर्गम पाड्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यास मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे, टेलीहेल्थच्या माध्यमातून एसएमबीटी हॉस्पिटलच्या स्पेशालिटी आणि सुपरस्पेशालिटी डॉक्टरांची ऑनलाईन सेवा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय ही सेवा पूर्णपणे मोफत आहे. आजही अनेक वाड्यावस्त्यांवर रुग्णवाहिका पोहोचत नाही, अनेक अडचणी येतात. मात्र, यादरम्यान मोबाईल नेटवर्क असलेल्या भागात मोबाईलच्या माध्यमातून पोहोचून वैद्यकीय मार्गदर्शन यापुढे केले जाणार आहे. एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे त्यांनी कौतुक केले. दर्जेदार आरोग्यसेवा तंत्रज्ञान आणि रुग्णांच्या प्रती करुणा यांचा संगम साधत आरोग्यसेवेत सकारात्मक बदल घडवला जाऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे एसएमबीटी असे कौतुक त्यांनी केले.

याप्रसंगी रक्तविकार कर्करोगतज्ञ डॉ. गिरीश बदरखे, मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ संदीप ईशी, जनरल व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. नितीन बस्ते यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टर्स, प्राध्यापक, उपस्थित होते. स्वदेस फाउंडेशन आणि एसएमबीटीच्या वतीने समन्वयक म्हणून डॉ. अश्विनी देशमुख यांनी काम बघितले.
‘त्या’ ६०० गावांसाठी टेलीहेल्थ वरदान
उत्तम आरोग्य हे अंतर, उपलब्ध संसाधने किंवा एखाद्याचा विशेषाधिकार न राहता ते प्रत्येक व्यक्तीस सन्मानाने मिळाले पाहिजे. स्वदेसचे आरोग्यमित्र ज्या ६०० अतिदुर्गम गावांत काम करत आहेत तेथील नागरिकांसाठी एसएमबीटीच्या माध्यमातून आरोग्य सल्ला व मार्गदर्शन, टेलीहेल्थच्या माध्यमातून होणार आहे. यासोबतच या आरोग्यमित्र आणि स्वयंसेवकांना एसएमबीटीतर्फे प्रथमोपचारासाठी प्रशिक्षणदेखील दिले जाणार आहे.
-डॉ. मीनल मोहगांवकर, अधिष्ठाता, एसएमबीटी हॉस्पिटल

‘स्वदेस उत्सव २०२५’ चे आयोजन
स्वदेस फौंडेशनच्या वतीने स्वदेस उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विविध क्रीडा उपक्रम यामध्ये क्रिकेट, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ इतर खेळांसह सहभागात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स्वदेस संस्थेशी निगडीत अनेक सदस्य याठिकाणी दाखल झाले होते या सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. या उत्सवाद्वारे आरोग्य, क्रीडा व सामाजिक एकात्मतेचा संदेश देण्यात आला.

तज्ञ डॉक्टर करणार मार्गदर्शन
हॉस्पिटलच्या वतीने टेलीहेल्थ सेवेसाठी सर्व निकष आणि तयारी पूर्ण करण्यात आली आहे. आमचे तज्ञ डॉक्टर अॅपच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील रुग्णांसोबत संवाद साधतील. आरोग्यमित्रांच्या सहाय्याने रुग्णांला असलेला आजार, तपासून योग्य तो सल्ला देतील. या टेलीहेल्थ अॅपमध्ये ठिकाणी रिपोर्ट अपलोड करणे, औषधोपचार कळवणे आणि रुग्णांना योग्य त्या सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
-सचिन बोरसे, सीओओ, एसएमबीटी हॉस्पिटल
