संगमनेर : गर्भपात करताना महिलेचा मृत्यू 

संबंधित प्रकरणाची चौकशी सुरू आहे — सिव्हिल सर्जन

संगमनेर प्रतिनिधी दिनांक 24 

एका 29 वर्षीय महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाल्याने संगमनेर शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असतानाच या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याचे अहिल्यानगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी सांगितले आहे.

गर्भपाताची शासकीय मान्यता प्राप्त नसलेल्या रुग्णालयामध्ये एप्रिल महिन्यात एका महिलेचा गर्भपात करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी सदर महिलेची प्रकृती गंभीर होऊन तिचा मृत्यू झाला. या संदर्भात संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्त्या बानोबी शेख यांनी आरोग्य विभागाकडे तक्रार करून संबंधित रुग्णालय आणि डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे

दरम्यान सुरुवातीला सदर महिलेवर जोर्वे येथील महिला डॉक्टर वसुधा काकड यांनी गोळ्या देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला, मात्र सदर महिलेची प्रकृती अधिक खालावल्याने त्या महिलेला संगमनेर येथील डॉक्टर प्रवीण पानसरे यांच्या धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. तेथेही उपचार केल्यानंतर सदर महिलेची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने तिला प्रवरानगर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र तेथे उपचार सुरू असताना सदर महिलेचा मृत्यू झाला. या घटनाक्रमाबाबत सविस्तर तक्रार शेख यांनी आपल्या अर्जात केलेली आहे. त्या अर्जानुसार नगरचे सिव्हल सर्जन डॉक्टर नागोराव चव्हाण यांनी संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना सदर प्रकरणी संबंधित डॉक्टरांना आदेश देऊन जिल्हास्तरीय माता मृत्यू अन्वेषण समिती समोर हजर राहण्यास सांगितले होते.

त्यानंतर सोशल मीडियातून या प्रकरणी आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर या प्रकरणाने गंभीर स्वरूप घेतले असून या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सांकडे संपर्क केला असता त्यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे. शिवाय संबंधित डॉक्टरांनी केलेल्या उपचाराबाबत सविस्तर खुलासा जिल्हा शल्यचकिस्तकांकडे करण्यात आला आहे. आता या चौकशीनंतर अंतिम कारवाई काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र एक तरुण माता निष्काळजीपणामुळे मृत्यू पावली असल्याची चर्चा असून आरोप प्रत्यारोपात महिलेच्या मृत्यूचे कोणालाही दुःख नाही हेही तितकेच खरे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!