योगासन स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यापीठ संघ अव्वल !

संत तुकडोजी महाराज विद्यापीठाने रौप्यपदकावर नाव कोरले
प्रतिनिधी —
योगासनांना खेळ म्हणून मान्यता प्राप्त झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रातील योगासन खेळाडूंनी अप्रतीम कामगिरी करत विजयश्री खेचून आणली. बेंगलुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करतांना महाराष्ट्राच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सुवर्ण तर नागपूरच्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठाने रौप्य पदकाची कमाई केली. हरियाणाच्या हिसार येथील गुरु जांभेश्वर विद्यापीठाने कांस्यपदक मिळवित तिसरा क्रमांक पटकाविला. जैन विद्यापीठाच्या प्रांगणात झालेल्या या संपूर्ण स्पर्धेचे व्यवस्थापन वर्ल्ड योगासनाचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय योगासन स्पोटर्स फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांनी पाहिले.

योगासनांना खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर स्पर्धात्मक खेळांमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला. योगासनांचा प्रचार-प्रसार व्हावा यासाठी राष्ट्रीय योगासना स्पोर्टस् फेडरेशनची स्थापना करण्यात आली. गेल्यावर्षी भारतीय विद्यापीठ संघटनेच्या (एआययु) माध्यमातून भुवनेश्वर येथे विद्यापीठ स्तरीय राष्ट्रीय योगासन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील दोनशेहून अधिक योगासन संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्या मुला-मुलींच्या गटातील प्रत्येकी आठ संघांची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड करण्यात आली.

याच सोळा संघांचा समावेश बेंगलुरु येथील जैन विद्यापीठात पार पडलेल्या खेलो इंडिया स्पर्धेत करण्यात आला होता. या स्पर्धेत मुलींच्या गटात सानीका केळकर, आकांक्षा खराडे, स्नेहा काळे, प्रगती देशमुख, श्रेया कंधारे व जोत्स्ना ढमढेरे यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करतांना पहिला क्रमांक पटकविला, तर नागरपूरच्या संत तुकडोजी महाराज विद्यापीठाला दुसरा क्रमांक मिळाला. या संघात श्रृष्टी शेंडे, नृपूर बाकळे, कल्याणी चूटे, छकुली सेलुकर, रसिका भक्ते व आदिती चौधरी यांचा समावेश होता. हरियाणातील हिसार येथील गुरु जांभेश्वर विद्यापीठाला तिसरा क्रमांक मिळाला.

मुलांच्या गटातही महाराष्ट्राने आपला दबदबा कायम राखतांना वैभव श्रीरामे, वैभव देशमुख, हर्षल चूटे, शुभम वंजारी, अजीत घवघवे व विपूल पोहरकर यांच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला तर मनन कासलीवाल, ऋषीराज माने, घननील लोंढे, ओंकार दाभोळे, अनिकेत मेहेत्रे व अभिजीत सावंत यांच्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघाने दुसरा क्रमांक पटकाविला. भिवानीच्या चौधरी बन्सीलाल विद्यापीठाला तिसर्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

संपूर्ण देशातून निवडलेल्या दोन्ही गटातील प्रत्येकी आठ संघात महाराष्ट्रातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा समावेश होता. अतिशय अतितटीच्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या तिनही संघांनी अत्यंत कठीण अशा योगासनांच्या विविध आसनांचे प्रदर्शन करीत सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई करुन या संपूर्ण स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. केंद्रीय अवजड उद्योगमंत्री महेंद्रनाथ पांडेय, बेंगलुरुच्या जैन विद्यापीठाचे कुलपती डॉ.चैनराज रॉयचंद, राष्ट्रीय योगासना स्पोर्टस् फेडरेशनचे सेक्रेटरी जनरल डॉ.जयदीप आर्य व वर्ल्ड योगासना तथा राष्ट्रीय योगासना स्पोर्टस् फेडरेशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांच्याहस्ते विजेत्या स्पर्धकांना पदकांसह पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

योगासनांना खेळाचा दर्जा मिळाल्यानंतर स्थापन झालेल्या राष्ट्रीय योगासना स्पोर्टस् फेडरेशनच्या उपाध्यक्षपदाची धुरा गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानंतर संघटनेच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर राबविलेल्या पंच प्रशिक्षण कार्यक्रमासह योगासनांच्या विविध राज्य व राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. खेलो इंडियात पहिल्यांदाच झालेल्या या संपूर्ण स्पर्धेच्या व्यवस्थापनाची जबाबदारीही डॉ.मालपाणी यांच्या माध्यमातून महाराष्ट्राकडे सोपविण्यात आली होती. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या देशव्यापी स्पर्धा संपन्न झाल्या.
