संगमनेर शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी एक कोटी रुपयांचा निधी !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क
संगमनेर शहर आता तिसऱ्या डोळ्याच्या निगराणीखाली येणार असून, शहराच्या सुरक्षेसाठी आणि गुन्हेंगारीवर वचक बसविण्यासाठी नगरपालिका हद्दीतील मुख्य चौक, सार्वजनिक ठिकाणं आणि संवदेनशिल भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती आमदार खताळ यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका हद्दीत सीसीटीव्ही बसवून सामाजिक सुरक्षेला प्राधान्य देण्याची भूमिका पालकमंत्री विखे पाटील यांनी घेतली आहे. यापुर्वी अहिल्यानगर शहरांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याला सुरुवात झाली आहे. जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधीची तरतुद करण्यात आली आहेत. संगमनेर शहरा करीता १ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाल्याने शहरवासियांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.
शहरातील महत्वाची ठिकाणं, मुख्य रस्ते, उपनगरातील काही भाग, बाजारपेठ, गर्दीचे चौक आणि सरकारी कार्यालयांच्या परिसरात विशेषत्वाने सीसीटीव्हीची नजर आता असेल. त्यादृष्टीने त्याबाबतचे नियोजन करण्यात येणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले. सर्व सीसीटीव्हींसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षही कार्यान्वित करण्यात येणार आहे. गुन्हेंगारीला आळा, चोऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर नजर ठेवणे या सुविधेमुळे सोपे होणार आहे.
शहरातील नागरीकांची सुरक्षाही आमची प्राथमिकता असून, पोलिसांनाही तपास कार्यात या यंत्रणेची मोठी मदत होईल. संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत आणल्यामुळे महिला व जेष्ठ नागरीकांना सुरक्षिततेची हमी मिळेल असा विश्वास आमदार खताळ यांनी व्यक्त केला.
शहरातील प्रभाग क्र.१३ मध्ये असलेल्या जेधे कॉलणीतील वाल्मिक मंदिराच्या रंग, फरशी, शेड, घोटाई व त्या अनुषंगिक कामांसाठी २० लाख रुपये तर शामबाबा मंदिराच्या फ्लोरींग दुरुस्ती व रंग कामाकरीता १० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून पालकमंत्री विखे पाटील यांनी मंजूर केला असल्याची माहीती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
