ॲसिड हल्ला प्रकरणी संगमनेर मध्ये सराफ सुवर्णकार संघटनेचा मूक मोर्चा

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

वडगाव पान येथे इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या शाळकरी मुलीवर ॲसिड फेकण्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद उमटले. आज सकाळी भव्य रास्ता रोको करण्यात आला. त्याच दरम्यान संगमनेर शहर सराफ सुवर्णकार संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात येऊन या घटनेचा तीव्र निषेध करीत शहर पोलीस आणि प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.  

 

निवेदनात म्हटले आहे की, या निवेदनाद्वारे आपले लक्ष संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी आणि अमानवीय घटनेकडे वेधत आहोत. एका निरागस अल्पवयीन चिमुरडीवर झालेला ॲसिड हल्ला हा केवळ व्यक्तिगत गुन्हा नसून तो संपूर्ण समाजाच्या सुरक्षिततेवर आणि माणुसकीवर झालेला हल्ला आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट असून पालकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

 

या प्रकरणी आमचे कायदेशीर आणि सामाजिक मागण्यांचे निवेदन खालीलप्रमाणे आहे:

१. ‘पॉक्सो’ (POCSO) आणि भारतीय कायद्यांच्या कठोर कलमांतर्गत कारवाई : सदर गुन्हा हा एका अल्पवयीन बालिकेवर झालेला असल्याने, या प्रकरणात Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act मधील तरतुदींसह भारतीय दंड संहितेच्या अंतर्गत अत्यंत कठोर कलमे लावून दोषारोपपत्र ( Charge-sheet) दाखल करण्यात यावे.

२. खटला ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात चालवणे

गुन्हेगाराला तातडीने शासन व्हावे यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक ( Fast Track Court) मध्ये चालवण्यात यावे. अशा संवेदनशील गुन्ह्यांमध्ये ‘जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड’ (विलंब झालेला न्याय म्हणजे न्याय नाकारणे होय) अशी परिस्थिती निर्माण होऊ नये.

३. विशेष सरकारी अभियोक्त्याची ( Special Public Prosecutor ) नियुक्ती :

पीडितेची बाजू न्यायालयात भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने या खटल्याकरिता नामवंत आणि निष्णात विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करावी, जेणेकरून आरोपीला कोणतीही पळवाट मिळणार नाही.

४. मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत

महाराष्ट्र शासनाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत पीडित बालिकेला आणि तिच्या कुटुंबाला तातडीने जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यात यावी, जेणेकरून तिच्या पुढीलvवैद्यकीय उपचारांत खंड पडणार नाही.

५. ॲसिड विक्रीवर कडक निर्बंध

सर्वोच्च न्यायालयाच्या (लक्ष्मी वि. भारत सरकार) निकालानुसार, ॲसिड विक्रीवर अत्यंत कडक निर्बंध असणे अनिवार्य आहे. संगमनेर परिसरात ॲसिडची छुप्या पद्धतीने होणारी विक्री तात्काळ थांबवून सर्व विक्रेत्यांची तपासणी करावी.

६. तपास अधिकारी आणि सुरक्षितता

या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एका सक्षम आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. तसेच पीडित कुटुंब आणि साक्षीदारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी.

वरील सर्व कायदेशीर बाबींचा विचार करून प्रशासनाने या नराधमाला फाशी किंवा मरेपर्यंत जन्मठेप मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत. जर या प्रकरणात प्रशासनाकडून दिरंगाई झाली किंवा पीडितेला न्याय मिळण्यास अडथळे आले, तर आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू असा इशाराही शेवटी देण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!