शिबलापूर येथे अवैध मुरूम उपसा आणि विनापरवाना वाहतुकीचा धुमाकूळ !प्रांत अधिकाऱ्यांकडे तक्रार

​आश्वी | वार्ताहार 

शिबलापूर (ता. संगमनेर) परिसरातून मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उपसा आणि विनापरवाना वाहतूक सुरू असून, प्रशासनाच्या आशीर्वादानेच हा प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय मुन्तोडे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी उपविभागीय अधिकारी, संगमनेर यांना सविस्तर निवेदन दिले असून दोषींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

​मुन्तोडे यांनी निवेदनात नमूद केले की, मालुंजे आणि पानोडी गावातून शासनाची कोणतीही परवानगी न घेता अवैध मुरूम उपसा केला जात आहे. ही वाहतूक करणाऱ्या गाड्यांना नंबर प्लेट नाहीत, तसेच मालावर ताडपत्रीही झाकली जात नाही. ही वाहने शिबलापूर चौफुलीवरून अतिवेगाने धावतात, ज्यामुळे मोठे दगड आणि मुरूम रस्त्यावर सांडत आहेत. यामुळे आतापर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात होऊन नागरिक जखमी झाले आहेत.

​विशेष म्हणजे, मंडल अधिकारी आणि सर्कल यांच्या कार्यालयासमोरूनच ही अवैध वाहतूक राजरोसपणे सुरू असतानाही कोणतीही कारवाई केली जात नाही. यामुळे यात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध असावेत, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा तातडीने पंचनामा करून विना नंबर प्लेटच्या गाड्या जप्त कराव्यात, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने शिबलापूर चौफुलीवर ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

“प्रशासनाने हप्तेखोरी थांबवावी, अन्यथा उग्र आंदोलन” – 

“गेल्या अनेक दिवसांपासून शिबलापूर आणि परिसरातून अवैध मुरूम व वाळूची तस्करी सुरू आहे. विना नंबर प्लेटच्या गाड्या अतिवेगाने धावत असल्याने शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा जीव धोक्यात आला आहे. महसूल विभागाचे कर्मचारी आणि आरटीओ (RTO) डोळेझाक करत आहेत. शेतकऱ्यांना एक न्याय आणि या तस्करांना दुसरा न्याय का? जर तातडीने ही अवैध वाहतूक थांबवली नाही आणि रॉयल्टीच्या पावत्या तपासल्या गेल्या नाहीत, तर आम्ही मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांकडे दाद मागू. संविधानाच्या मार्गाने आम्ही या अन्यायाविरोधात उग्र आंदोलन उभारू.”

– संजय मुन्तोडे (तक्रारदार)

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!