अकोलेत शेतकरी-श्रमिकांचा महामुक्काम सत्याग्रह ; मागण्या मान्य न झाल्यास मुंबईकडे लाँग मार्च
संगमनेर प्रतिनिधी –
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान, जमिनींचे हक्क आणि ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळलेल्या पात्र महिलांचा पुनर्समावेश या मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर राज्यव्यापी महामुक्काम सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे. अखिल भारतीय किसान सभा, सीटू, एआयडवा आणि डीवायएफआयच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे.
मागण्या मान्य न झाल्यास २६ ऑक्टोबरपासून अकोले ते मुंबई वाहनांचा लॉंग मार्च काढण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. २१ ते २६ ऑक्टोबरदरम्यान सरकारने ठोस निर्णय न घेतल्यास २१ जिल्ह्यांतील शेतकरी ट्रॅक्टर, पिकअप आणि अन्य वाहनांसह अकोले येथे जमून मुंबईकडे रवाना होतील, असे आयोजकांनी सांगितले.

उद्या जाहीर सभा
गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी अकोले येथे जाहीर सभा होणार आहे. माकपच्या नेत्या वृंदा करात, डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जीवा पांडू गावित, आमदार विनोद निकोले आणि डॉ. अजित नवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
आंदोलन मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवासस्थान ‘वर्षा’पर्यंत नेण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने सुमारे ८१ लाख महिलांना ‘लाडकी बहीण’ योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. पात्र महिलांचा योजनेत पुनर्समावेश करून थकीत हप्ते देण्याची मागणीही करण्यात आली आहे.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांमध्ये दुष्काळग्रस्तांना नुकसानभरपाई, नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान, वनजमीन, देवस्थान जमीन, गायरान आणि घरांच्या तळजमिनींचे हक्क, ‘नमो शेतकरी’ योजनेचे थकीत हप्ते तसेच पीकविम्याची नुकसानभरपाई यांचा समावेश आहे.
२६ ऑक्टोबरच्या लॉंग मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन डॉ. अशोक ढवळे, जीवा पांडू गावित, विनोद निकोले, डॉ. अजित नवले आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत तहसील कार्यालयासमोरील आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका आंदोलकांनी स्पष्ट केली आहे.

