संगमनेरातल्या साठ जणांची झाली तब्बल साडेसहा कोटींची फसवणूक !…..

तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

शेअर मार्केटमध्ये पैशाची गुंतवणूक करा तुम्हाला चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून पैशाची गुंतवणूक करण्यास भाग पाडून संगमनेर तालुक्यातील 60 ते 62 लोकांची 6 कोटी 65 लाख 39 हजार 837 रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला असून संगमनेर पोलिसांनी या संदर्भात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

योगेश रामदास जऱ्हाड (वय 35 वर्ष, खाजगी नोकरी, राहणार आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश विश्वास मोरे (राहणार माळेगाव पठार, तालुका संगमनेर) वैभव विठ्ठल काकड (राहणार डोळासने घारगाव तालुका संगमनेर) राहुल शिंदे राहणार (आश्वी बुद्रुक तालुका संगमनेर) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिघा आरोपींनी फिर्यादीला संगमनेर तालुक्यातील अदमास डेप्ट कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड व प्रथम वेल्थ मॅनेजमेंट ऑफिस या ऑफिसमध्ये बोलावून शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करा तुम्हाला चांगला फायदा होईल आणि त्याचा चांगला परतावा मिळवून देऊ असे आमिष दाखवून फिर्यादी कडून वेळोवेळी पैसे घेतले.

फिर्यादीने आरोपीच्या कंपनीला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वेळोवेळी एकूण सुमारे वीस लाख रुपये दिले असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला थोडाफार परतावा मिळाला. परंतु नंतर कुठलाही परतावा देण्यात आला नाही. फिर्यादीने वारंवार तगादा केला तरीही पैसे देण्यात येत नव्हते. ऑफिसमध्ये चौकशी करण्या साठी गेले असता ऑफिसही बंद असल्याचे आढळून आले. वारंवार मागणी करूनही आरोपींकडून पैसे देण्यास नकार मिळाल्याने योगेश रामदास जऱ्हाड यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात फिर्यादीसह संगमनेर तालुक्यातील 60 ते 62 जणांनी पैसे गुंतवले असून ती रक्कम 6 कोटी 65 लाख 39 हजार 837 इतकी मोठी आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!