शिर्डीत भाविकांना लुटणाऱ्या दलालांना प्रशासनाचा चाप

​ संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची रस्त्यात अडवणूक करून त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या प्रवृत्तींवर प्रशासनाने आता कठोर कारवाईसाठी पावले उचलले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी माणिक आहेर यांनी एका विशेष आदेशाद्वारे, सार्वजनिक ठिकाणी उभे राहून भाविकांना थांबवणे, फसवणे किंवा त्यांची दिशाभूल करणे या कृत्यांवर तत्काळ बंदी घातली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

​शिर्डी हे जागतिक दर्जाचे देवस्थान असल्याने येथे देश-विदेशातून लाखो भाविक येतात. सण-उत्सवांच्या काळात ही गर्दी अधिक असते. याचा गैरफायदा घेत काही लोक रस्त्यावर गाड्या अडवून भाविकांना खासगी पार्किंगमध्ये जाण्यास भाग पाडतात. तसेच, अवाजवी दराने पूजासाहित्य घेण्याची सक्ती करणे किंवा ‘जलद दर्शन’ करून देण्याच्या बहाण्याने फसवणूक करण्याचे प्रकारही वाढले आहेत. भाविकांनी विरोध केल्यास त्यांना दमदाटी व धक्काबुक्की केली जाते. बाहेरगावचे भाविक तक्रार करायला घाबरत असल्याने, स्थानिक पोलिसांनी स्वतः फिर्यादी होऊन गेल्या दोन वर्षांत तब्बल ६५ गुन्हे दाखल केले आहेत.

​वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलीस, श्री साईबाबा संस्थान व नगरपरिषद यांच्या अहवालानुसार प्रशासनाने २ फेब्रुवारी रोजी एक प्राथमिक आदेश काढला होता. यावर काहींनी आक्षेप नोंदवला होता. मात्र, या आदेशामुळे कोणाच्याही कायदेशीर रोजगारावर गदा येणार नसून केवळ उपद्रव करणाऱ्यांना रोखले जाणार असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने तो आक्षेप फेटाळून लावला व हा कायमस्वरूपी आदेश लागू केला.

​या नव्या आदेशानुसार रस्ते, चौक, बसस्थानक किंवा प्रवेश मार्गावर उभे राहून भाविकांशी मध्यस्थी करण्यावर पूर्णपणे मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीने स्वतःला संस्थानचा किंवा प्रशासनाचा प्रतिनिधी असल्याचे भासवून निवास, भोजन किंवा दर्शनाच्या नावाखाली अनधिकृत व्यवहार करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना शिर्डी पोलिसांना दिल्या असून, नियम मोडणाऱ्यांवर ‘भारतीय न्याय संहिता २०२३’ च्या कलमांनुसार कारवाई केली जाणार आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!