संगमनेर शहरात पोलीस वसाहतीच्या निर्मितीस मंजुरी — आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
संगमनेर शहरामध्ये नव्या पोलीस वसाहतीच्या निर्मितीस मंजुरी मिळाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक सहकार्यामुळे व आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही मंजुरी प्राप्त झाली.

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस हाऊसिंग बोर्डाच्या महासंचालक अर्चना त्यागी मॅडम (IPS) यांची आमदार तांबे यांनी भेट घेतली.

या भेटीदरम्यान पोलीस वसाहतीच्या बांधकामास लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी तसेच या वसाहतीचा आराखडा आधुनिक व नियोजनबद्ध पद्धतीने तयार करण्यात यावा व जास्तीत जास्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना निवासाची सुविधा मिळावी. ही वसाहत संगमनेर शहराच्या सौंदर्यात व वैभवात भर घालणारी असावी याबाबत चर्चा केली.

ही पोलीस वसाहत पूर्ण झाल्यानंतर संगमनेर शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा दीर्घकालीन प्रश्न सुटणार असून याचा थेट फायदा कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यासाठी होणार आहे.
