संगमनेर तालुक्यात पर्यटन विकासासाठी २ कोटींच्या कामांना मान्यता
आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांना यश
संगमनेर प्रतिनिधी —
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत संगमनेर तालुक्यातील विविध देवस्थाने व धार्मिक पर्यटन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी एकूण २ कोटींच्या पर्यटन अनुषंगिक कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण व आध्यात्मिक पर्यटनाला नवचैतन्य मिळणार आहे.

यासंदर्भात आमदार अमोल खताळ यांच्या प्रसिद्धी विभागाकडून प्रेस नोट देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, संगमनेर तालुक्याती देवकौठे येथील जगदंबा माता मंदिरासाठी ५० लाख, तळेगाव येथील श्री बिरोबा मंदिर परिसरा साठी २० लाख, गुंजाळवाडी येथील काशीविश्वेश्वर मंदिरासाठी २० लाख, सोनोशी येथील वटमाई देवी मंदिरासाठी २० लाख, काकडवाडी येथील महालक्ष्मी माता मंदिरासाठी २० लाख, संगमनेर बु. येथील साळीवाडा परिसरातील खंडोबा मंदिरासाठी २० लाख, लोहारे येथील श्री आवाजीनाथ बाबा देवस्थानासाठी २० लाख, निमज येथील श्री बिरोबा मंदिर परिसरासाठी१५ लाख, तसेच धांदरफळ खु. येथील बिरोबा मंदिर परिसरासाठी १५ लाख असा दोन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाली आहे.


प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ही कामे राबविली जाणार असून, परिसरा तील सुविधा उभारणी, थीम-आधारित नियोजन, पायाभूत रचना सुदृढ करणे, स्वच्छता व्यवस्था, प्रवेशमार्ग सुधारणा यासारख्या गरजांवर भर दिला जाईल. कामे वेळेवर व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी शासनाने कठोर अटी घातल्या असून निधीचा पारदर्शक वापर करणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनाच्या विकासासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई तसेच पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आभार मानले आहे.
