महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर पासून बेमुदत संपावर !
प्रतिनिधी —
आपल्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी राज्यातील सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचारी चार डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्राच्या अध्यक्षा ॲड. निशाताई शिवूरकर यांनी दिली आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी सतत संघर्ष सुरु असतो. ४८ वर्षांपासून देशात एकात्मिक बाल विकास प्रकल्पा मार्फत महिला व बालकांच्या साठी अंगणवाड्या चालवल्या जातात. बालकांचे आरोग्य, कुपोषण निर्मूलन, बाल शिक्षण, लसीकरण तसेच महिलांचे आरोग्य, गरोदपणातील काळजी, माता मृत्यू रोखण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी महत्वाचे काम करतात. अत्यंत अल्प मानधनावर या महिला काम करतात.

या महिलांना वेतनश्रेणी मिळावी, मानधनात वाढ व्हावी अशी सतत मागणी सुरु आहे. गेल्या वर्षी सर्वोच न्यायालयाने या महिला सरकारच्या कर्मचारी आहेत, त्यांना ग्रॅज्युएटी व अन्य लाभ मिळाले पाहिजेत, असा निर्णय एका प्रकरणात दिला. केंद्र व राज्य सरकार न्यायालयीन निर्णयाचे पालन करण्यास तयार नाही. त्याच प्रमाणे महागाई निर्देशांका प्रमाणे मानधन वाढ देत नाही. कर्मचाऱयांना वाढत्या महागाईत जीवन जगणे मुश्कील झाले आहे. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सरकारकडे वारंवार मागणी करुनही सरकार दुर्लक्ष करते आहे. त्यामुळे अखेर ४ डिसेंबर २०२३ पासून महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार आहेत.

अंगणवाडी सेविका व मिनी सेविकेला दरमहा २६ हजार व मदतनीसला दरमहा २० हजार रुपये मानधन मिळावे, वेतनश्रेणी, ग्रॅज्युएटी मिळावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना मासिक पेंशन मिळावे, प्रती लाभार्थी बालकाला मिळणाऱ्या आहाराची रक्कम वाढवावी इत्यादी मागण्या या आंदोलनात केल्या आहेत. शासनाला जाग आणण्यासाठी नोव्हेंबर महिन्याच्या मासिक बैठकांवर बहिष्कार घालण्याचा आणि मासिक अहवाल न देण्याचाही निर्णय कृतिसमितीने जाहीर केला आहे.

या आंदोलनात एकजुटीने सहभागी होवून संप यशस्वी करण्याचे आवाहन ॲड. निशा शिवूरकर, सत्यभामा तीटमे, भारती धरत, पुजा घाटकर, बेबी हरणामे, इंदुमती घुले, मंदाकिनी क्षीरसागर, सुनंदा राहणे, सुनंदा कदम, कल्याणी देशमुख, चंद्रकला फापाळे, कांता राहणे, नारंगाबई ढोक्रे, समिना शेख, सोनाली पवार, शांताराम गोसावी यांनी केले आहे.

