ओबीसींच्या आरक्षणाला एकाही मराठ्याने कधीच विरोध केला नाही…. मग आमच्या आरक्षणाला तुम्ही विनाकारण विरोध कशाला करता ? मनोज जरांगे पाटील यांचा सवाल
आता मात्र सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार ; सरकारला इशारा
प्रतिनिधी —
ओबीसींच्या आरक्षणाला एकाही मराठ्याने कधीच विरोध केला नाही. एवढेच नव्हे तर कोणाच्याही आरक्षणाला विरोध केला नाही. सगळ्यांना आरक्षण मिळाले. मग आमच्या आरक्षणाला तुम्ही विनाकारण विरोध कशाला करता. असा सवाल करीत आता मात्र सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

राज्यात कालपर्यंत ३२ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत. या आधारे प्रमाणपत्र देण्याचे कामही सुरू आहे. याचा फायदा मराठा समाजातील जवळपास दोन कोटी लोकांना होणार असल्याचे स्पष्ट करत मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत मी गप्प बसणार जीव गेला तरी चालेल मात्र सरकारच्या छाताडावर बसून आम्ही आरक्षण घेऊ असा सज्जड इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

मराठा समाजाला एकत्र करत वज्रमुठ आवळणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी सायंकाळी संगमनेरमध्ये जाणता राजा मैदानावर सभा झाली यावेळी जरांगे पाटील बोलत होते. या सभेला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

जरांगे पाटील म्हणाले, आत्तापर्यंत मराठ्यांना आरक्षण समजू दिले नाही. सत्तर वर्षांपूर्वीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते तर त्याचा मोठा फायदा समाजाला झाला असता, मराठा समाजाची मुले आयएएस, आयपीएससारख्या मोठ्या पदांवर गेले असते. त्यांना घरी बसावे लागले नसते. मात्र जाणून-बुजून समाजाला आरक्षण दिले गेले नाही. सत्तर वर्ष षडयंत्र रचले गेले. पुरावे बुडाखाली दाबून ठेवले गेले. पुरावे नाही म्हणणारे हे नेते कोण हे समजायला हवे. आरक्षणासाठी मराठा समाज एकवटल्यानंतर आता सरकारमध्ये हालचाली सुरू झाल्या. सरकार समोर मोठा पेच निर्माण झाला आहे. मराठा समाज मागास असल्याचा अहवाल दिला गेला मात्र आरक्षण दिले गेले नाही.

आत्तापर्यंत तीन वेळा मराठा समाज आरक्षणापासून हुकला. १८०५ पासूनच्या नोंदी सापडल्या आहे, तरी आरक्षण दिले गेले नाही. ओबीसीसह इतर समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कधीही मराठा समाजाने विरोध केला नाही. मात्र आता आरक्षणासाठी मराठा समाज एकवटल्यानंतर विरोध होताना दिसत आहे. मराठ्यांनी ७० वर्षात अनेक पक्ष मोठे केले, आपले नेते मोठे केले. गरज पडेल तेव्हा ते मदत करतील असे वाटत होते. मात्र आज मराठा समाजाच्या मागे कोणीही उभा राहिला नाही, अशी खंत व्यक्त केली.

आपण सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची वेळ दिली आहे, तोपर्यंत आपली देखील कसोटी लागणार आहे. १ डिसेंबर पासून पुन्हा जोमाने साखळी उपोषणे सुरू करा. माझा जीव गेला तरी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. तुमच्या बळावर मी जीवाची बाजी लावली आहे. तुमच्या पाठिंब्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. तुम्ही एकजूट राखावी असे आवाहन त्यांनी यावेळी समाजाला केले.

