संगमनेरच्या कत्तलखान्यांवर भल्या पहाटे पोलिसांचा छापा !

२ हजार ९०० किलो गोवंश मांस पकडले

तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

प्रतिनिधी —

संगमनेर शहरातील कुप्रसिद्ध कत्तलखान्यात गोवंश हत्या सुरूच असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले. आज पहाटे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने शहरातील कत्तलखान्यावर छापा घालून तब्बल २ टन ९०० किलो गोमांस पकडले आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

नवाज कुरेशी, जब्बार पटेल, वाहिद कुरेशी (रा. संगमनेर) अशी गुन्हा दाखल केलेले आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आज पहाटे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की, संगमनेर शहरातील कत्तलखान्यांमध्ये गोवंश हत्या करण्यात येत आहे. हा प्रकार शहरातील जमजम कॉलनी या ठिकाणी सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

वाघचौरे यांनी त्यावेळी गस्तीवर असणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने, आरटीपीसी पोलीस नाईक अनिल कडलग व शामराव हासे यांना तातडीने फोन करून त्या ठिकाणी छापा घालण्याच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक माळी संगमनेर शहर स्टाफ व तालुका पोलीस ठाण्यामधील पिटर मोबाईल वरील स्टाफ तसेच पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार या सर्वांनी मिळून वैद्यकीय अधिकारी यांच्यासह जमजम कॉलिनी, गल्ली नंबर सहा या ठिकाणी हिरव्या रंगाच्या मारुती ओमनी कार एम एच ०४ ए डब्ल्यू ३१६४ दिसून आली त्यामध्ये तपासणी केली असता गोवंश जनावरांचे कत्तल केलेले मांस आढळून आले.

तसेच भंगार दुकानाच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये तपासणी केली असता त्या ठिकाणी सुद्धा गोवंश जनावरांचे मांस मिळवून आले. या ठिकाणी ९०० किलो वजनाचे गोवंश मांस पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर पत्र्याचे शेड हे नवाज कुरेशी याचे असून सदरची जागा जब्बार पटेल याची असल्याची माहिती मिळाली. तसेच कत्तल केलेले गोवंश जातीचे मांस नवाज कुरेशी व जब्बार पटेल यांनी केलेले असल्याचीही माहिती मिळाली.

पोलिसांनी लगेच जमजम कॉलनी परिसरातील इतर ठिकाणी तपासणी केली असता निळ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केलेले २ हजार किलो वजनाचे गोवंश मास आढळून आले. सदर पत्र्याच्या शेडचा मालक पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. सदर पत्र्याची शेड व शेडची जागा ही वाहिद कुरेशी याची असल्याचे माहिती मिळाली. शेडमध्ये कत्तल केलेले गोवंश मांस हे वाहिद कुरेशी यांनी केल्याचे आढळून आले.

या दोन्हीही ठिकाणी पोलिसांना २ हजार ९०० किलो मांस आढळून आले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक शामराव सुखदेव हासे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून नवाज कुरेशी, जब्बार पटेल, वाहिद कुरेशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!