आमदार बाळासाहेब थोरात यांचा राजीनामा !
नाना पटोले यांच्या कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा…
प्रतिनिधी —
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. थोरात यांनी आपला राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठविला असून काँग्रेस हाय कमांड या संदर्भात काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान थोरात यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची संबंधित असलेले थोरात काँग्रेसमधील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे विधिमंडळ पक्षनेते पदाची जबाबदारी होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेस मधील काही नेत्यांवर थोरात नाराज असून या संदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींना सविस्तर पत्र पाठवले असल्याची माहिती दोन दिवसापूर्वी त्यांनी संगमनेर येथील एका कार्यक्रमात ऑनलाइन संबोधित करताना दिली होती.

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून पक्षांतर्गत रंगलेले राजकारण थोरात यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरले आहे. विशेष म्हणजे आज थोरात यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी आपला राजीनामा काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठविल्याची माहिती पुढे येत आहे.

दरम्यान या संदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली असून आमदार बाळासाहेब थोरात यांची प्रकृती चांगली नसल्याने ते आमच्याशी बोलत नाहीत. त्यांचा कुठलाही राजीनामा आमच्याकडे आलेला नाही, असे म्हटले आहे. मात्र या संदर्भातील वृत्त काही वाहिन्यांनी प्रसिद्ध केले आहे. विधानपरिषद निवडणुकीचे कवित्व अजूनही संपलेले दिसत नाही.

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अधिवेशनादरम्यान थोरात मॉर्निंग वापरत असताना पडल्याने त्यांच्या खांद्याला जबर दुखापत झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्णतः आरामाचा सल्ला दिल्याने विधान परिषद निवडणूक काळात थोरात कोठेही नव्हते.

याच दरम्यान थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांनी बंडखोरी करत नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविली आणि निवडून देखील आले. तसेच यासंदर्भात त्यांनी कोणतीही भूमिका जाहीर केलेली नव्हती.
निवडणूक निकालानंतर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शनिवारी संगमनेरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ऑनलाईन संवाद सादर प्रथमत:च भूमिका जाहीर केली. यानंतर पक्षात मोठा गदारोळ उडाला होता.

नाना पटोले यांच्या कडून वाढदिवसाच्या शुभेच्छा ….
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ट्विटर द्वारे या शुभेच्छा त्यांनी दिल्या असून आपणास उदंड निरोगी आयुष्य लाभो हि सदिच्छा व्यक्त केली आहे.

