भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन !
प्रतिनिधी —
माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड रविवारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात आणि डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी संगमनेरात येत असताना भाजप आणि हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध करीत बस स्थानक चौकात आंदोलन केले. आंदोलकांवरील उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांचे नियंत्रण सुटल्याने आंदोलकांनी तेथून धाव घेत कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जाणता राजा मैदानाकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या पोलिसांनी आंदोलकांना रोखले. त्यामुळे आंदोलकांनी तेथेच नाशिक-पुणे मार्गावर पुन्हा ठिय्या देत महामार्ग रोखला. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामुळे महामार्गावर बघ्यांची गर्दी जमली होती.

माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांचा भाजपसह विविध संघटनासह निषेध व्यक्त होत आहे. संगमनेरमध्येही त्यांना विरोध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन सुरू असताना स्थानिक एकही वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित नव्हते. दोन उपनिरीक्षकासह पोलीस ताफा असला तरी त्यांना आंदोलकांनी दाद दिली नाही. त्यामुळे आंदोलन बराच वेळ सुरू होते. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्याचा वारंवार प्रयत्न केला मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलकांनी नंतर संधी साधत आंदोलकांनी कार्यक्रमस्थळी जाण्याचा प्रयत्न केला. दोन्ही ठिकाणी आंदोलकांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलक तेथून पळत असताना त्यांना काही अंतरावर मैदानाकडे जाण्याच्या प्रयत्नात अडविण्यात आले. या मार्गावर पुन्हा आंदोलकांनी आंदोलन केले. मात्र त्यानंतर आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान आंदोलकांनी ज्यांना संगमनेरमध्ये येण्यास विरोध दर्शवला ते आमदार जितेंद्र आव्हाड संगमनेरमध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यामुळे काही वेळ एकीकडे आंदोलन आणि दुसरीकडे आव्हाड यांचा कार्यक्रम स्थळी प्रवेश असे चित्र होते. या कार्यक्रमात आव्हाड यांनी जोरदार भाषणही केले.

