आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करता येणार या ॲपवर ; १०० मिनिटांत होणार कारवाई
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे यासाठी निवडणूक आयोगाने cVIGIL ॲप अपडेट केलं आहे. या ॲपच्या मदतीने आचारसंहिता भंगाची तक्रार काही मिनिटांत करता येते आणि त्यावर केलेल्या कारवाईची माहिती १०० मिनिटांत तक्रारकर्त्यापर्यंत पोहोचते. लोकसभा निवडणुकीच्या काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे दिसल्यास, मोबाईलवरून त्याबाबत सहज तक्रारदेखील करता येईल.

आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी Android फोनमध्ये Cvigil ॲप डाऊनलोड करावं लागेल. त्यानंतर तुम्ही आचारसंहिता उल्लंघनाबाबत फोटो किंवा व्हिडीओद्वारे ऑनलाईन तक्रार करू शकता. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तक्रारदाराची ओळख गुप्त ठेवली जाते आणि आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाते.

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पण, त्यांच्यावर कारवाई करण्या साठी कोणतेही पुरावे आढळले नाहीत. त्यामुळे आचारसंहिता भंगाच्या बहुतांश घटनांमध्ये वेळेवर कारवाई होऊ शकली नाही. पण, Cvigil ॲपच्या मदतीने तक्रार करताना आचारसंहिता भंगाचा फोटो किंवा २ मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करू शकता. ज्याच्या आधारावर निवडणूक आयोग तक्रार केल्यानंतर १०० मिनिटांत कारवाई करतो.

