महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव..
पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बस वाहक – चालकावर गुन्हा दाखल केला नाही
प्रतिनिधी —
पतीच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या बस चालक व वाहकावर गुन्हा दाखल करण्याच्या तक्रारीची दखल न घेतल्याने संगमनेर शहर पोलीस आणि तक्रारी बाबत मयताच्या पत्नीने महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे.

याबाबतची माहिती अशी की, २६ जानेवारी २०१९ रोजी शिवाजीनगर पुणे येथील एसटी बस स्थानकातून सकाळी ११ ते १२ वा. च्या दरम्यान इस्लामपूर नाशिक बस (क्रमांक एम एच १४ बी टी ४३४७) या बस मध्ये प्रवास करणाऱ्या दिलीप जगन्नाथ पगारे यांचे निधन झाले होते. पवार यांना प्रवासादरम्यान बस मध्ये त्रास होऊन त्यांना उपचाराची गरज असून देखील बस रुग्णालयात न केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. वाहक व चालक यांच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा मृत्यू झाला अशी तक्रार पगारे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दिलीप पगारे (रा. गणेश नगर, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक) यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात केली होती.

मात्र सहा वर्ष होऊन देखील त्यावर कुठलीच कारवाई न झाल्यामुळे त्यांनी सदर तक्रार महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्याकडे केली असून याबाबत दाद मागितली आहे.

या बसमधून प्रवास करीत असताना आळेफाटा दरम्यान दिलीप पगारे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना उलटी झाली. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी एसटी वाहकाला सदर गोष्ट सांगितली आणि गाडी दवाखान्यामध्ये घेऊन चला अशी विनंती केली. परंतु सदर गाडी वाहकाने व चालकाने रुग्णालयात न नेता घारगाव येथील एका ढाब्यावर जेवणासाठी थांबवली. दिलीप पगारे यांच्या छातीत दुखू लागल्याने ते थोड्यावेळ गाडीतच झोपले. मात्र वाहक चालकाने दवाखाना पुढे आहे असे सांगून गाडी संगमनेर बस स्थानकाच्या बाहेर आली असता मला व माझ्या नातवाला रस्त्यावर खाली उतरवून माझ्या पतीच्या खिशातील काढलेली एसटी प्रवासाची तिकिटे वाहकाने काढून घेऊन पतीला एका रिक्षात झोपून एसटी बस घेऊन तेथून निघून गेली.

आम्ही सदर रिक्षाने खासगी हॉस्पिटलमध्ये गेलो असता तेथे माझे पती दिलीप पगारे हे आधीच मयत झाले असल्याचे सांगितले. तेथून घुलेवाडी येथील शासकीय रुग्णालयात नेले असता देखील तेथील डॉक्टरांनी पगारे हे मयत झाले असल्याचे घोषित केले.

त्यामुळे सदर इस्लामपूर नाशिक बसमधील वाहक आणि चालकाने आळेफाटा ते संगमनेर दरम्यान माझ्या पतीला रुग्णालयात गाडी न नेता थेट संगमनेर येथे बस स्थानकात गाडी न नेता रस्त्यावर उतरून दिले म्हणून त्या दरम्यान प्रवासात माझ्या पतीचा मृत्यू झाला व या मृत्यूस वाहक आणि चालक जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी लक्ष्मीबाई पगार यांनी लेखी तक्रार संगमनेर शहर पोलिसांकडे दिली होती. त्यावर कुठलीही कारवाई अद्याप झालेली नसल्याने त्यांनी आता महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे दाद मागितली आहे.
संगमनेर शहर पोलिसांनी या संदर्भात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून त्या बाबतचा अहवाल प्रांत कार्यालयास पाठविला असल्याची माहिती मिळाली आहे.

