लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
प्रतिनिधी —
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठीची मतदान प्रक्रिया पार पडेपर्यंत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी मतदान केंद्र परिसरात १३ मे २०२४ पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश असणार आहेत.

जिल्ह्यातील मतदान होणाऱ्या केंद्रापासून २०० मीटर परिसरात मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, स्मार्ट फोन, कॉर्डलेस फोन, पेंजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

मतदान केंद्र अधिकारी, सूक्ष्म निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी यांच्या व्यतिरिक्त खासगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
