कुरण ग्रामपंचायतीला १० लाख रुपये दंड !

अवैध उत्खनन करून ‘मुरूम’ विकला !!

संगमनेर तहसीलदारांची कारवाई

प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यातील कुरण गावातील ग्रामपंचायतीने गौण खनिजाची (मुरूम) अवैध प्रकारे उत्खनन करून विक्री केल्याबद्दल संगमनेर तहसीलदारांनी सदर ग्रामपंचायतीला १० लाख ५८ हजार ४०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसे आदेश तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिले आहेत.

याबाबतची हकीकत अशी की, संगमनेर तालुक्यातील कुरण ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांनी संगणमताने गट नंबर २५७ मधून ८४ ब्रास अवैध उत्खनन करून विक्री केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ४८(७) मधील तरतुदीनुसार गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक व रॉयल्टी असा एकूण १० लाख ५८ हजार ४०० रुपयांचा दंड ग्रामपंचायतला ठोठावण्यात आला आहे.

कुरण गावातील सरपंच, ग्रामसेवक ग्रामपंचायत ने असा मुरूम अवैधरित्या उत्खनन करून तो विकला असल्याचा अहवाल मंडळ अधिकारी (समनापुर) यांनी तहसील कार्यालयाला दिला होता. पंचनामा आणि अहवाल तहसील कार्यालयाचा प्राप्त झाल्यानंतर कुरण ग्रामपंचायतीला नोटीस देण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने सदरची तक्रार ही राजकीय आकसा पोटी केल्याचे म्हटले होते. ग्रामपंचायतने कोणताही मुरूम किंवा गौण खनिजाचे उत्खनन केलेले नाही. त्यामुळे ही तक्रार पूर्णतः खोटी आहे. तसेच गट नंबर २५७ मधील ८४ ब्रासच्या उत्खननासाठी केलेला खड्ड्याचा पंचनामा हा पूर्वीचाच आहे. त्याच्याशी ग्रामपंचायतचा कोणताही संबंध नाही. सदरचा पंचनामा हा तक्रारदाराच्या नातेवाईक यांनी बनवून शासनाची दिशाभूल केली असल्याचे ग्रामपंचायतीने खुलाश्यात म्हटले होते. मात्र ग्रामपंचायतीचा हा खुलासा तहसीलदार यांनी अमान्य करीत ग्रामपंचायतीला दंड ठोठावला आहे.

८४ ब्रास मुरूम बाजारभावाने त्याची किंमत आणि पाच पट दंड तसेच रॉयल्टी ची रक्कम असा एकत्रित १० लाख ५८ हजार ४०० रुपयांचा दंड कुरण ग्रामपंचायतीला करण्यात आला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!