अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या चिमुकल्यांनी बनविले गणपतीचे मखर
प्रतिनिधी —
अमृतवाहिनी संस्थेच्या विश्वस्त शरयू देशमुख यांच्या संकल्पनेतून मॉडेल स्कूलचे विद्यार्थी व जिल्हा परिषद शाळेतील ग्रामीण भागातील विद्यार्थी यांच्यामध्ये जास्तीत जास्त समन्वय व्हावा या उपक्रमांतर्गत गणपती उत्सवातील मखर बनवण्याचा आनंद सर्व चिमुकल्यांनी घेतला.

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल मधील चिमुकल्यांनी अंभोरे, पिंपारणे, देवगाव, जाखुरी या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांच्या समवेत गणेश चतुर्थी निमित्त गणपती सजावटीचे मखर बनविले. या लहान मुलांना गणेश चतुर्थीचे महत्त्व याचबरोबर श्रावण व भाद्रपद महिन्यांमध्ये असलेल्या विविध सणांचे व संस्कृतीचे महत्त्व समजावून सांगत विद्यार्थ्यांकडून कला कौशल्य शिकवत गणपती आरस व साहित्य, मखर बनवण्याचे उपक्रम करून घेतले.

यामुळे विद्यार्थ्यांमधील कला कौशल्य विकसित होऊन त्यांना नवनिर्मितीची आवड निर्माण होईल असा विश्वास प्राचार्य शितल गायकवाड यांनी व्यक्त केला आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील शाळांमधील विद्यार्थ्यांसमवेत संवाद व्हावा यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल विस्तार अधिकारी गोसावी, केंद्रप्रमुख बोरसे सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमाच्या आयोजनाबद्दल आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, विश्वस्त शरयू देशमुख, दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्राचार्य विवेक धुमाळ, प्राचार्य, सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

