श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय कोल्हेवाडी येथे….
“अंधश्रद्धा व नदी प्रदूषण एक समस्या व नदी स्वच्छता अभियान”
प्रतिनिधी —
श्री संत जनार्दन स्वामी विद्यालय कोल्हेवाडी येथे विठ्ठल शेवाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. प्रमुख व्याख्याते शेवाळे यांनी “अंधश्रद्धा व”नदी प्रदूषण एक समस्या व नदी स्वच्छता अभियान” याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

ते म्हणाले की,” ग्रंथप्रामाण्य किंवा व्यक्तीप्रामाण्य न मानता बुद्धीप्रामाण्य मानले पाहिजे. म्हणजे आपल्या बुद्धीला जे पटेल तेच मानले पाहिजे. अर्थात ते पटण्यासाठी आपण आधी ते तपासून घेतले पाहिजे.कोणी काही म्हटलं तर ते बरोबर आहे की चूक आहे सत्य आहे की असत्य आहे की नाही ते तपासून घ्यावे लागते. अशा व्यक्तीला बुद्धीवादी व्यक्ती म्हणता येईल आणि आपण सर्वांनी बुद्धीवादी बनलं पाहिजे.

शेवाळे यांनी सहकाऱ्यांसह नदी स्वच्छता उपक्रमास सुरुवात केली असून संगमनेर व अकोले तालुक्यातील प्रवरा नदीच्या व आढळा नदीच्या पात्रात आढळणारे प्लास्टिक गोळा करून दर आठवड्याला ते संगमनेरला आणले जाते व त्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरासाठी योग्य केले जाते.

संत जनार्दन स्वामी विद्यालयाने सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या घरातील प्लास्टिकच्या जेवढ्या वस्तू आहेत त्या दर आठवड्याला गोळा करून शाळेच्या आवारामध्ये आणून ठेवाव्यात. आठवड्यातून एकदा संगमनेरहून एक गाडी येईल व ती गाडी हे सगळे प्लास्टिक गोळा करून घेऊन जाईल. अशी माहिती त्यांनी दिली.

या उपक्रमासाठी त्यांनी आढळा नदीचे उगमापासून ते संगमापर्यंत पायी प्रवास करून नदी प्लास्टिक मुक्त कशी होईल याविषयी चिंतन केले. निरुपयोगी प्लास्टिक कचरा होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. अशा विविध विषयावर त्यांनी मंथन केले.

विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत माघाडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, “पर्यावरण संरक्षण प्रत्येक सजीवांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे आपल्या घरातील परिसरातील जितके निरुपयोगी प्लास्टिक सापडेल तेवढे शाळेत आणून जमा करायचे आहे. आपल्या घराचा, गावाचा, शाळेचा परिसर नेहमी स्वच्छ असला पाहिजे. सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संगमनेर या संस्थेच्या वतीने स्वच्छ समृद्ध शाळा स्पर्धा २०२४ आयोजित केलेली असून या स्पर्धेमध्ये तसेच “गांधी तीर्थ स्वच्छ सुंदर शाळा” या स्पर्धेमध्ये विद्यालयाने भाग घेतला असून पालकांनी आपल्या मुलांना स्वच्छते संबंधी दररोज मार्गदर्शन करावे अशी विनंती त्यांनी केली.

स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन शिवाजी खुळे हे मनोगतात म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी नेहमी स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे. आपली शाळा नेहमी स्वच्छ सुंदर असली पाहिजे. मुलांनी आणि गावाने ठरवले तर काहीही अशक्य नाही. तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन स्वच्छ सुंदर शाळेचे बक्षीस मिळवून दाखवा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

या कार्यक्रमाचे सूत्रससंचालन सदुकर थोरात यांनी केले. तर आभार ‘माझी शाळा सुंदर शाळा” या प्रकल्पाचे प्रमुख शंकर शिंदे यांनी मानले. व “निरुपयोगी प्लास्टिकमुक्त शाळा व कोल्हेवाडी गाव” हा प्रकल्प आम्ही यशस्वी करून दाखवू” असे आश्वासनही त्यांनी विद्यालयाच्या वतीने दिले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर (बार्टी, पुणे) येथील समन्वयक रजत अवसक, राहुल शिंदे व माजी प्राचार्य सुभाष देशमुख सर यांनी सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक प्रतिनिधी अशोक सातपुते, ज्येष्ठ शिक्षक एन. बी. कोल्हे, आप्पासाहेब तुरकणे, अशोक गुंजाळ, कृष्णा काशीद, रामदास भालेराव, हर्षद कोल्हे, अरुण वामन, गाडे, थोरात, भालेराव, लांडगे, राहुल वर्पे अरुण पानसरे, हासे, मयूरी शिंदे, विद्या देवकर, शुभांगी डेंगळे, व शिक्षकेतर कर्मचारी बाळू गायकवाड, नरेंद्र गायकवाड, सुनील यादव यांनी परिश्रम घेतले. सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

