अकोलेत सहा महिन्यात २०० हेक्टर वनक्षेत्र जळून खाक !

 अकोले प्रतिनिधी —

अकोले राजुर भागातील वनक्षेत्रांमध्ये सुमारे १४७ आग लागण्याच्या घटना गेल्या सहा महिन्यांमध्ये घडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. जंगलांना आगी लागू नये म्हणून कितीही प्रयत्न केले तरी वन विभागाचे प्रयत्न अपुरे पडतात. यामध्ये काही समाजकंटक दरवर्षी अशा आगी लावण्याचा उद्योग करत असल्याचे देखील आढळून आले आहे.

विशेष म्हणजे अकोले तालुक्यातील वनसंपदेला दरवर्षी आग लागण्याच्या घटना घडतात. सातत्याने अशा घटना घडत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा निघणे आवश्यक आहे. नैसर्गिकरित्या आगी लागण्याचे, वनवा भडकण्याचे प्रकार कमी असले तरी कृत्रिमित्या काही ठिकाणी मुद्दामहून आगी लावण्यात येत असल्याचे देखील सांगण्यात येते.

यावर्षीही गेल्या सहा महिन्यात तालुक्यात १४७ आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सुमारे दोनशे हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले आहे. अनेक वर्षांपासून सांभाळण्यात आलेले हे जंगल असे जळून जात असेल तर यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. त्यातच सातत्याने लागणाऱ्या अशा आगीमुळे जंगलांमधील पशुपक्षी, प्राणी, सरपटणारे लहान मोठे प्राणी यांना सुद्धा या आगीच्या भक्षस्थानी पडावे लागते व त्याचा फटका सर्वत्र बसतो.

आगीच्या घटना ह्या डोंगरी भागात उंच ठिकाणी घडत असल्याने त्या ठिकाणी आग आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येणारे उपाय तोकडे पडत आहेत. वनविभाग असा प्रयत्न करीत असला तरी उंच ठिकाणी जाऊन आगी लावणे हा एक संशोधनाचा विषय आहे. विशेष म्हणजे टप्प्याटप्प्याने गवत पेटवून या आगी भडकवण्याचा प्रयत्न केल्याचे देखील आढळून आले असल्याचे सांगितले जाते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!