संगमनेर मध्ये राहणारे परप्रांतीय निघाले दरोडेखोर !

बेलवंडी पोलिसांची मोठी कारवाई ; ७ जणांना अटक

ट्रान्सफॉर्मर कंपनीत दरोडा टाकणारी आंतरराज्य टोळी पकडली 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —

रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन कोळगाव गावच्या शिवारातील चिखली घाट येथील इकोसिस्टीम ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग वर्कशॉपवर शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद करण्यात बेलवंडी पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी ७ सराईत गुन्हेगारांना अटक केली असून, अटक करण्यात आलेले आरोपी हे मूळ उत्तर प्रदेश राज्यातील रहिवासी असून, ते सध्या अहमदनगर जिल्ह्यातील बोटा तालुका संगमनेर परिसरात राहत होते.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे –

१. नजीबउल्ला चम्मन सहा (वय ३२, रा. बोटा तालुका संगमनेर, मूळ रा. बिजनोरा, उत्तर प्रदेश)

२. अमितकुमार मुन्ना सरोज (वय २०, रा. वेळू ता. भोर, जि. पुणे, मूळ रा. मगरदहा, उत्तर प्रदेश)

३. रवि ब्रिजलाल अग्रवाल (वय ३४, रा. बोटा, ता. संगमनेर, मूळ रा. भवरिया, उत्तर प्रदेश)

४. सुभाषचंद्र ब्रिजलाल अग्रवाल (वय ४४, रा. बोटा, ता. संगमनेर, मूळ रा. भवरिया, उत्तर प्रदेश)

५. लालुकुमार कामेश्वर चौधरी (वय २२, रा. बोटा, ता. संगमनेर, मूळ रा. झंजाडपूर, जि. मधुबनी, बिहार)

६. शिवपुजन रामकुमार अग्रहरी (वय २७, रा. बोटा, ता. संगमनेर, मूळ रा. महत्निया, उत्तर प्रदेश)

७. कलामउद्दीन कमरउद्दीन ठाकुर (वय ४१, रा. कुदळवाडी, विठ्ठल मंदिराजवळ, चिखली, ता. हवेली, जि. पुणे)

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २७/०४/२०२६ रोजी मध्यरात्री १२:०० ते पहाटे ०४:०० वाजण्याच्या सुमारास कोळगाव गावच्या शिवारातील ‘चिखली घाट’ येथे असलेल्या ‘युको सिस्टीम ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग’ वर्कशॉपवर ही घटना घडली.

चार अनोळखी इसम वर्कशॉपच्या पाठीमागील बाजूने पत्रे उचकटून आत घुसले. त्यांनी तेथे उपस्थित असलेले मजूर आणि वॉचमन सुभाष आनंदा पवार (रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) यांचे दोन्ही हात कॉटनच्या पट्टीने (टेपने) पाठीमागे बांधून ठेवले. त्यानंतर आरोपींनी त्यांना चाकूचा आणि जीवे मारण्याचा धाक दाखवून शांत बसण्यास बजावले. “सकाळपर्यंत दुकानाच्या बाहेर आलात तर तुमचा काटा काढू”, अशी धमकी देत दरोडेखोरांनी वर्कशॉपचे पुढील शटर उघडून आत प्रवेश केला.

शटर उघडल्यानंतर बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या इतर ३ ते ४ साथीदारांना त्यांनी आत बोलावून घेतले. या टोळीने वर्कशॉपमधील ट्रान्सफॉर्मरचे महागडे कॉपर (तांबे) आणि इतर मौल्यवान साहित्य जबरदस्तीने चोरून नेले. या घटनेनंतर बेलवंडी पोलीस ठाण्यात गु.र.नं ११०/२०२६ भा.न्या.सं कलम ३१०(२)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सदरील आरोपी यांचा शोध घेत असताना माहिती मिळाली की, सदरचे आरोपी हे सध्या शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील गुन्ह्यात अटक आहेत. त्यानंतर माननीय न्यायालयाच्या परवानगीने वरील आरोपींचा बेलवंडी पोलीस स्टेशन ने ताबा घेऊन याचा पुढील तपास सुरू केला आहे. या टोळीने महाराष्ट्रात इतरही ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास बेलवंडी पोलीस करत आहेत. 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, पोलिस शिपाई कैलास शिपणकर, दादासाहेब क्षीरसागर, विनोद पवार, आदित्य बेलेकर, चालक भाऊसाहेब शिंदे, विकास सोनवणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांच्याकडील पोलीस नाईक प्रताप देवकाते, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू ,पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे व होमगार्ड यांनी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!