लग्नाच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या महिलांची टोळी पकडली !
अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती
प्रतिनिधी —
राहाता पोलिसांनी विवाह जुळवण्याच्या बहाण्याने तरुणांची फसवणूक व खंडणी मागणाऱ्या तीन महिलांच्या टोळीला अटक केली असून, एका तरुण शेतकऱ्याला डांबून ठेवून २ लाख ३० हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईमुळे विवाह जुळवणाऱ्या अशा बोगस टोळ्यांचे मोठे रॅकेट समोर आले असल्याची अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी माहिती दिली.
याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात रेश्मा केशव काटे (रा. नऱ्हे, पुणे), मंगल अंकुश पठारे (रा. साकुरी शिवार, राहाता) आणि सुगंधा कैलास गायकवाड (रा. साकुरी शिवार, राहाता) या तिन्ही महिलांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती येथील एका ३० वर्षीय शेतकरी तरुणाला विवाहासाठी मुलगी हवी होती. मध्यस्थांमार्फत त्याचा संपर्क पुणे येथील रेश्मा केशव काटे नावाच्या महिलेशी झाला. रेश्मा हिने त्याला राहाता तालुक्यातील साकुरी शिवार येथील मंगल अंकुश पठारे हिच्याकडे विवाहासाठी मुलगी असल्याचे सांगितले.
सुरुवातीला मुली दाखवण्याच्या बहाण्याने ऑनलाईन पद्धतीने १२ हजार ५०० रुपये घेण्यात आले. त्यानंतर १९ जून २०२६ रोजी तक्रारदार तरुण, त्याचा भाऊ व मित्रांना साकुरी शिवार येथील मंगल पठारे हिच्या घरी बोलावण्यात आले. तिथे त्यांना सुगंधा कैलास गायकवाड नावाची मुलगी दाखवण्यात आली. मुलीच्या कुटुंबाबाबत विचारणा केली असता, ‘तिला आई नाही, वडील दारू पितात आणि तिचे सर्व कार्य आम्हीच करणार’ असे भासवून आरोपी महिलांनी या तरुणाचा विश्वास संपादन केला.

यानंतर आरोपींनी कोर्ट मॅरेजच्या मागणीला नकार देत घरातच तातडीने लग्न लावून देण्याचा तगादा लावला आणि तब्बल २ लाख ३० हजार रुपयांची मागणी केली. या अचानक झालेल्या पैशांच्या मागणीमुळे तरुणाला संशय आला. त्याचे मित्र पैसे आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडताच, संतापलेल्या आरोपी महिलांनी फिर्यादी तरुण आणि त्याच्या मित्राला घरात डांबून ठेवले.
इतकेच नव्हे तर बाहेर गेलेल्या नातेवाइकांना फोन करून २ लाख ३० हजार रुपयांची खंडणी दिली तरच सुटका करण्याची धमकी दिली. या कठीण प्रसंगात बाहेर पडलेल्या मित्रांनी तातडीने राहाता पोलीस स्टेशन गाठून मदत मागितली. पोलिसांनी वेळ न घालवता साकुरी शिवार येथील गोदावरी वसाहतीमधील मंगल पठारे हिच्या घरावर छापा टाकला आणि डांबून ठेवलेल्या तरुणांची सुटका केली.

विशेष म्हणजे, आरोपी मंगल पठारे हिच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा शोध घेतला असता, तिच्याविरुद्ध राहाता पोलीस ठाण्यात २०२२ आणि २०२५ मध्येही अशाच स्वरूपाचे फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, नागरिकांनी कोणत्याही मध्यस्थावर आंधळा विश्वास न ठेवता समोरच्या कुटुंबाची पूर्ण पडताळणी करावी आणि असे संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे जाहीर आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक सरोदे व त्यांच्या पथकाने केली आहे.

अवैधपणे पैसे मिळवण्याच्या मोहापायी या महिला टोळीने विवाहाच्या बहाण्याने अनेक पुरुषांची फसवणूक केल्याची दाट शक्यता आहे. सुनंदा गायकवाड या मुलीचे बोगस आधार कार्ड आणि खोटा शाळा सोडल्याचा दाखला (TC) बनवून हा संघटित गुन्हा केला गेल्याचा पोलिसांना संशय असून, त्या दृष्टीने कसून तपास सुरू आहे. जर या टोळीकडून कोणाची अशी फसवणूक झाली असेल, तर त्या तक्रारदारांनी न घाबरता पुढे यावे आणि राहाता पोलीस ठाण्यात त्वरित संपर्क साधून तक्रार नोंदवावी.”
— सोमनाथ वाघचौरे (अपर पोलीस अधीक्षक)
