राज्यातील शाळा तात्पुरत्या स्वरूपात सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात – भाऊ चासकर 

 शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 

लांबलेला पावसाळा, वाढलेला उकाडा व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर विदर्भ वगळता राज्यातील शाळा तात्पुरत्या स्वरूपात सकाळच्या सत्रात भरविण्यात याव्यात अशी मागणी ॲक्टिव्ह टीचर्स फोरमचे राज्य संयोजक भाऊ चासकर यांनी केली असून शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांना तसे पत्र देखील दिले आहे. 

 शालेय शिक्षण मंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, यावर्षी मान्सूनचे आगमन अपेक्षेपेक्षा उशिरा झाले असून जून महिन्याच्या मध्यावरही राज्यातील अनेक भागांमध्ये एप्रिल महिन्यासारखी तीव्र उष्णता, दमट वातावरण तसेच पाणीटंचाईची समस्या कायम आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि शाळांमधील उपलब्ध मूलभूत सुविधांचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे.

दरवर्षी मार्च व एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळांचे वेळापत्रक बदलून सकाळच्या सत्रात शाळा भरविण्याचा निर्णय घेतला जातो. मात्र सध्याही उष्णतेची तीव्रता कायम असताना विद्यार्थ्यांना दिवसभर या वातावरणात शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेक शाळांमध्ये लोखंडी पत्र्यांच्या वर्गखोल्या, अपुरा वीजपुरवठा तसेच पिण्याच्या पाण्याची कमतरता यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः डोंगरदऱ्यांतील वाड्या-वस्त्यांवरील शाळांमध्ये स्वच्छतागृहासाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.

शिक्षणाचा अधिकार आणि शैक्षणिक सातत्य महत्त्वाचे असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे. शैक्षणिक दिवसांचे नियोजन पुढील काळात योग्य प्रकारे करता येऊ शकते. त्यामुळे मूलकेंद्री शिक्षणाच्या दृष्टिकोनातून हवामानात सुधारणा होऊन उष्णतेची तीव्रता कमी होईपर्यंत विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शाळा किमान पुढील १५ दिवस सकाळच्या सत्रात भरविण्याचे आदेश तातडीने द्यावेत, ही नम्र विनंती.

परिस्थितीनुसार शिक्षण व्यवस्थेमध्ये आवश्यक ती लवचिकता दाखवून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देणारा संवेदनशील निर्णय शासनाने घ्यावा, अशी अपेक्षा चासकर यांनी व्यक्त केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!