स्वतःला जसे आहात तसेच स्वीकारा — रचना मालपाणी
प्रतिनिधी —
आयुष्य आपल्याला मिळालेली एक सुंदर देणगी आहे. आपण कसे दिसतो त्यापेक्षा आपल्यामध्ये काय गुण आणि क्षमता आहेत ते जाणून घ्या. आपण स्वतःला जसे आहात तसे स्वीकारा कारण जिथे स्वीकार आहे तिथेच सुधार असतो. जीवनात जे काही होते ते नेहमी चांगल्यासाठीच होते म्हणून स्वतःवर, स्वतःच्या आयुष्यावर नितांत प्रेम करा, असे प्रतिपादन रचना मालपाणी यांनी केले.

शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात श्री.साईबाबा सभागृह येथे विद्यार्थीनी समुपदेशन समितीच्या वतीने कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतील अकरावी-बारावीच्या सर्व विद्यार्थीनींसाठी ‘व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वयंप्रेरणा’ या विषयावर आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यानात त्या बोलत होत्या. या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड, पर्यवेक्षक प्रा.आप्पासाहेब गुंजाळ, विद्यार्थीनी समुपदेशन समितीच्या कार्याध्यक्षा प्रा.अर्चना कोल्हे, प्रा.रसिका दिक्षित, प्रा. रंजना सानप आदि उपस्थित होते.

मालपाणी म्हणाल्या की, आपले मन, बुद्धि, शरीर उत्तम असणे आवश्यक आहे. त्यामुळे पूर्णवेळ भूतकाळ किंवा भविष्यात न राहता वर्तमानात जगणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण वर्तमानकाळ हा जीवनात आनंद निर्माण करणारा काळ आहे. त्यामुळे आयुष्यात नेहमी सकारात्मक राहणेही गरजेचे आहे. विद्यार्थीनींनी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन आपले करिअर चांगले घडविण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ‘माझा देश माझी जबाबदारी’ या भावनेने नेहमी वागायला पाहिजे. योग, व्यायाम याबरोबरच वाचनाचाही छंद जोपासायला हवा.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड म्हणाले की, आपली संस्कृती संस्काराच्या माध्यमातून जपणे महत्त्वाचे आहे. स्वतःचे स्वसंरक्षण करण्याची धमक विद्यार्थीनींमध्ये असायला हवी कारण महाविद्यालयीन जीवनातील अवखळ वयात चांगले-वाईट असे प्रश्न निर्माण होऊ शकतात. त्यासाठी सोशल-मिडीयाचा आवश्यक तेवढाच वापर करणे, आई-वडीलांचे स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, महाविद्यालयातील शिस्तीचे पालन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा.अर्चना कोल्हे यांनी केले. सूत्र संचालन प्रा.सारिका शिंदे व आभार प्रा.रसिका दिक्षित यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थीनी, शिक्षिका व शिक्षकेतर महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

