मणिपूर मधील घटनेच्या निषेधार्थ संगमनेर मध्ये महिलांचा भव्य निषेध मोर्चा !
प्रतिनिधी —
मणिपूर राज्यामध्ये महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेर शहरात महिलांनी काळ्या साड्या व काळे ड्रेस परिधान करून मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी असून यामुळे जगात देशाची नाचक्की झाली असल्याचा तीव्र संताप माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केला आहे.

जय हिंद महिला मंच व संगमनेर मधील विविध महिला संघटनांच्या वतीने संगमनेर बस स्थानक ते नवीन नगर रोड- मेन रोड- चावडी मार्गे शहरात निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विविध संघटनांच्या महिला काळ्या साड्या व काळे कपडे घालून सहभागी झाल्या होत्या. यावेळी संगमनेर मधील विविध महिला मंडळे व महिला संघटनांच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

याप्रसंगी ॲड. रंजना गवांदे, ॲड. ज्योती मालपाणी. ॲड. निशाताई शिवूरकर, हिरालाल पगडाल, डॉ. मैथिली तांबे यांनीही या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. निषेध मोर्चा नंतर अहिल्या सत्यजित तांबे हिच्या हस्ते पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.

देशातील महिला अत्याचारा संदर्भात राष्ट्रपतींना पोस्टकार्ड पाठवणार !
देशाच्या राष्ट्रपती ह्या आदिवासी समाजातील महिला असून काही राज्यांमध्ये महिलांवर होत असलेले अत्याचार अमानवीय आहे. महिला सुरक्षिततेचा देशभर महत्त्वाचा मुद्दा झाला असून याबाबत केंद्र व राज्य सरकारने गंभीर दखल घेण्याबाबत राष्ट्रपती द्रोपदीजी मुर्मु यांना संगमनेर मधून हजारो महिलांच्या वतीने पोस्टकार्ड पाठवण्यात येणार आहेत.

